कर्जतकडे जाणारी लोकल रुळावरून घसरली

फोटो - एएनआय

सामना ऑनलाईन । मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाजवळ कर्जतकडे जाणारी लोकळ रुळावरून घसरली आहे. सीएसएमटी ते मस्जिद दरम्यान लोकलचा एक डबा रुळावरून घसरला आहे. मोटरमनच्या डब्याची दोन चाकं रुळावरून घसरल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणताही जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सीएसएमटीवरून कर्जतला जाणारी लोकल रविवारी दुपारी १.४०च्या सुमारास रुळावरून घसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरून ही लोकल निघाली होती. प्लॅटफॉर्मवरून निघाल्यानंतर दोनच मिनिटात मोटरमनच्या डब्याची चाकं रुळावरून घसरली. हा अपघात घडला तेव्हा लोकलमध्ये ६० प्रवासी होते. मात्र लोकलचा वेग कमी असल्याचे सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल रुळावरून घसरल्याने डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या काही काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.