छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला; एक जवान शहीद-चार नागरिक ठार

1
cisf-bus-blast

सामना ऑनलाईन । दंतेवाडा

दिवाळीच्या दिवसातच नक्षलवाद्यांनी दंतेवाडा येथे मोठा नक्षलवादी हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी बचेली येथे भूसुरुंग स्फोट घडवून सीआयएसएफच्या बसला उडवलं. यामध्ये एक जवान शहीद झाला. तसेच अन्य चार स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

सीआयएसएफच्या जवानांची एक टीम मिनी बसमधून आकाश नगरच्या दिशेने रावाना झाली होती. ही टीम नेहमीप्रमाणे गस्तीवर होती. मात्र तिथून परताना जवानांना आपल्या सहकार्यांसाठी स्थानिक बाजारातून भाज्या घ्यायच्या होत्या. आकाश नगरच्या 6 क्रमांकाच्या वळणावर बस पोहोचली आणि अचानक स्फोट झाला. ही मिनी बस जवळपास 8 फूट उंच उडाली. बस जमीनीवर आदळताच लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवळपास 15 मिनिटे गोळीबार सुरू होता. त्यानंतर त्यांनी सरकार विरोधात घोषणा देत पळ काढला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी जगदलपूर येथे सभा घेणार आहेत. जगदलपूर हे दंतेवाडाला लागून असलेल्या बस्तर विधानसभा क्षेत्रात येते. त्यामुळे या हल्ल्यानंतर येथील सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे.

या आधी 27 ऑक्टोबर रोजी नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य केलं होतं. ज्यामध्ये चार जवान शहीद झाले होते. तर 30 ऑक्टोबर रोजी दूरदर्शनच्या एका टीमवर हल्ला केला होता. ज्यामध्ये दूरदर्शनचा कॅमेरामन आणि दोन जवानांचा मृत्यू झाला होता.