शौचालय बांधल्यामुळे करावी लागली जेलवारी

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानांतर्गत घरात शौचालय बांधणे छत्तीसगडमधील नागरिकांना चांगलेच महागात पडले आहे. शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून पैसे मिळणार असल्याने येथील नागरिकांनी व्याजावर पैसे घेऊन घरात शौचालय उभारले .पण सरकारकडून पैसे तर मिळालेच नाहीत. उलट व्याजाची परतफेड केली नाही म्हणून सावकारांनी त्यांना जेलमध्ये पाठवले आहे.

मोदी यांनी देशातील जनतेला स्वच्छता अभियानाचा नारा देत घरात शौचालय बांधण्याचे आवाहन केले होते. यासाठी सरकार नागरिकांना आर्थिक मदत करणार असे आश्वासनही त्यांनी जनतेला दिले होते. त्यानंतर सरकारी अधिकारयांनी गावोगावी जाऊन लोकांना शौचालय बांधण्यासाठी तयार केले. तसेच शौचालय उभारल्यानंतर सरकार तुम्हाला त्याचा खर्च देणार असल्याचे अधिकारयांनी नागरिकांना सांगितले. यामुळे मोदी व अधिकारयांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत छत्तीसगडमधील अंडी गावातील काही नागरिकांनी सावकाराकडून व्याजावर पैसे घेतले व २० हजार खर्चून घरामध्ये शौचालय उभारले.

त्यानंतर गावकरी सरकारी अधिकारयांकडे स्वच्छता अभियानांतर्गत मिळणारया पैशांची विचारणा करण्यासाठी गेले असता अधिकारयांनी त्यांना हाकलून लावले. याप्रकारामुळे भेदरलेल्या नागरिकांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. पण हे सरकारी काम असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना मदत करण्यास नकार दिला. तर दुसरीकडे सावकारांनी या नागरिकांकडे व्याज भरण्यासाठी तगादा लावला . यामुळे हवालदिल झालेल्या या नागरिकांनी आधिक पैसे मिळवण्यासाठी शहरात जाऊन मजुरी करण्यास सुरुवात केली. पण तरीही व्याजाची रक्कम पूर्ण झाली नाही. यामुळे सावकाराने या नागरिकां विरोधात पोलिसात तक्रार केली. त्यानंतर या सगळ्यांना जेलमध्ये टाकण्यात आले.

या विरोधात गावातील जनता एकत्र आली असून मोदी सरकारने फसवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.तसेच जेलमध्ये टाकण्यात आलेल्यांची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी गावकरयांनी केली आहे.