सुकमात पुन्हा हल्ला, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २ जवान जखमी

सामना ऑनलाईन । सुकमा

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. सीआरपीएफने नक्षलवाद्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेतल्यानंतर बिथरलेल्या नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

मागिल महिन्यात सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. त्यानंतर नक्षलवाद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या शोध मोहीमेदरम्यान १५-२० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले, तर २०-२२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पन केले होते. सुकमा हल्ल्याचा बदला घेतले असे यावेळी बोलण्यात येत होते.

सीआरपीएफच्या या कारवाईनंतर शुक्रवारी नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला, यात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना लष्कराच्या हेलिकॉप्टरने रायपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.