गोव्यात सरकार पाडण्याच्या हालचाली, मुख्यमंत्री पर्रीकर 2 दिवस आधीच परतले

सामना प्रतिनिधी । पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेत गेलेले असताना काँग्रेसने गोव्यातील भाजप सरकार पाडण्याच्या छुप्या हालचाली सुरु केल्या होत्या. याशिवाय विरोधकांच्या प्रशासन ठप्प झाल्याच्या आरोपांमुळे ऊठलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पर्रीकर दोन दिवस आधीच आज गोव्यात परतले आहेत. आजारी मंत्रिमंडळामुळे जनतेची विकासकामे ठप्प झाल्याची टीका काँग्रेसससह शिवसेनेनेही केली होती. राजकीय घडामोडीचा वेग वाढल्यानेच पर्रीकर लवकर राज्यात परातल्याची चर्चा गोव्यात आता रंगू लागली आहे.

नियोजित कार्यक्रमानुसार पर्रीकर 8 सप्टेंबरला अमेरिकेहून गोव्यात परतणार होते.मात्र आपल्या गैरहजेरीत घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते दोन दिवस आधीच गोव्यात परतले. अमेरिकेहून पर्रीकर यांनी काल मध्यरात्री मायदेशी प्रयाण केले. गुरुवारी दुपारी 3 वाजता ते मुंबईत परतले. तेथून सव्वा चारच्या विमानाने ते दाभोलीमला परतले.

काँग्रेसने केली होती राजकीय उलथापालथीची तयारी
काँग्रेसने मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या गैरहजेरीत राज्यातील छोट्या पक्षांशी संधान साधत भाजपला शह देण्याचा प्रयत्न सुरु केला होता. त्यातच भाजपचे ३ आमदार काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसचे 5 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते,काँग्रेसचे शिष्टमंडळ उद्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन राज्यातील भाजप सरकारच्या अकार्यक्षम कारभारात हस्तक्षेप करा आणि राज्यातील परिस्थिती सुधारा असे साकडे घालणार आहे.

“गोवा सरकारच्या विरोधात राज्यातील जनतेच्या मनात असंतोष खदखदतो आहे. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासन ठप्प झाल्याने जनतेची कामे होत नाहीत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोऱ्या वाजला आहे. त्यामुळे भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”
-जितेश कामत , शिवसेना गोवा राज्यप्रमुख