विश्वचषकासाठी ‘हे’ तीन खेळाडू रेसमध्ये, निवड समिती प्रमुखांचे सूचक वक्तव्य

11


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंड आणि वेल्समध्ये आगामी एक दिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या विश्वचषकाची टीम इंडियाच प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. विश्वचषकासाठी निवडण्यात येणाऱ्या संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. याच दरम्यान निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत, अष्टपैलू विजय शंकर आणि अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेची निवड होऊ शकते असे सूचक वक्तव्य केले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या एक दिवसीय आणि टी-20 मालिकेमध्ये ऋषभ पंत आणि विजय शंकरने दमदार खेळ केल्याने निवड समितीसमोरील आव्हान वाढले आहे. याच संदर्भात ‘क्रिकइन्फो’ने दिलेल्या वृत्तानुसार प्रसाद म्हणाले की, विश्वचषकासाठी पंत देखील रेसमध्ये आहे. त्याने चांगला खेळ करून निवड समितीची आव्हानं वाढली आहेत आणि ही एक चांगली गोष्ट आहे. गेल्या वर्षभरात पंतने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

विजय शंकरबाबत बोलताना प्रसाद म्हणाले की, शंकला जितकी संधी देण्यात आली तेवढ्या वेळा त्याने चांगला खेळ करत आपल्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे. आम्ही गेल्या दोन वर्षात हिंदुस्थान-अ संघाचा विविध दौऱ्यातील खेळ पाहिला आणि कोणता खेळाडू विश्वचषकासाठी फिट बसेल याची चाचपणी केल्याचेही प्रसाद म्हणाले. तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये रहाणेने चांगली कामगिरी केल्याने विश्वचषकासाठी निवडण्यात येणाऱ्या संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे, असेही प्रसाद म्हणाले.

पंतने पदार्पणानंतर कसोटी, एक दिवसीय आणि टी-20 मध्ये दमदार कामगिरी करत धोनीला आपणच मोठा पर्याय असल्याचे दाखवून दिले. विश्वचषकासाठी धोनी आणि कार्तिकसह पंतची अतिरिक्त फलंदाज म्हणून निवड होऊ शकते. तसेच अष्टपैलू शंकरने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 मध्ये कोहलीच्या अनुपस्थितीत नंबर तीनवर दमदार प्रदर्शन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या