भविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. या सगळ्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता सरकारने कडक कायदे करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. लहान मुलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याबाबत सरकार आता विचार करत आहे. केंद्र सरकारने याबाबतचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे.

सर्वोच्चा न्यायालयात दाखल केलेल्या प्रस्तावानुसार, ०-१२ वर्षांच्या लहान मुलांसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी असा प्रस्ताव केंद्र सरकारने मांडला आहे. पोस्को कायद्यामध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देता येणे शक्य होऊ शकते. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ एप्रिलला होणार आहे.

कठुआ प्रकरणामुळे हिंदुस्थानची आंतरराष्ट्रीय स्थरावर बदनामी झाली आहे. संयुक्त राष्ट्रानेही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.