नवी मुंबईत अपहरण झालेला चिमुकला कळव्यात सापडला!

सामना ऑनलाईन । ठाणे

नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकावरुन अपहरण करण्यात आलेला तीन वर्षाचा रघु शिंदे हा लहान मुलगा सापडला आहे. कळवा स्टेशन परिसरात हा चिमुकला एका महिलेला दिसला. त्यानंतर तिने कळवा पोलिसांना याबाबत माहिती दिली. महिलेच्या माहितीनुसार पोलिसांनी मुलाला आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर रघूला त्याच्या आई-वडिलांकडे देण्यात आलं आहे. मात्र, आरोपी फरार असून त्याने रघूचं अपहरण का केलं याबाबत पोलीस शोध घेत आहेत.

नवी मुंबईमधील वाशी रेल्वे स्थानकावर या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणाचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. ज्यामध्ये सीसीटीव्हीमध्ये आरोपी मुलाला कडेवर उचलून घेऊन जाताना दिसत होता. यामध्ये आरोपी झिंगलेल्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट दिसूत होते. त्यामुळे एखाद्या दारुड्याने किंवा अंमली पदार्थ सेवन करणाऱ्याने मुलाचे अपहरण केले असावे अशी शंका उपस्थित केली जात होती. मुलगा सुखरूप मिळाला असून अपहरणकर्त्याचा शोध पोलीस घेत आहे.