हिंदुस्थानी फुटबॉलचे भविष्य उज्ज्वल! स्पॅनिश ‘सुपरस्टार’ पुयोलच्या शुभेच्छा

आदित्य ठाकरे यांनी केले विश्वविजेत्या फुटबॉलस्टारचे स्वागत

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईसह हिंदुस्थानात विविध क्रीडा संघटना व हिंदुस्थानी सहकार देशात फुटबॉलच्या प्रसार आणि प्रचारासाठी ज्या आश्वासक योजना राबवत आहेत त्या पाहता हिंदुस्थानी फुटबॉलचे भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे, अशा शुभेच्छा स्पेनचा माजी ‘सुपरस्टार’ फुटबॉलपटू कार्लेस पुयोल याने अंधेरीच्या शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात आयोजिलेल्या ‘द मिशन इलेव्हन मिलियन’ फेस्टिव्हलच्या शुभारंभी सोहळ्यात बोलताना दिल्या. या सोहळय़ात युवासेना प्रमुख व मुंबई डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनचे चेअरमन आदित्य ठाकरे यांनी मराठीत लिजेंड ‘फुटबॉल स्टार’ पुयोलचे स्वागत केले. मुंबईकरांकडून झालेले शानदार स्वागत व शहाजी राजे संकुलातील क्रीडा विकास कार्यक्रमांनी पुयोल प्रभावित झाला होता.

आदिदास या क्रीडा उपकरणे व स्पोर्टसवेयर उत्पादक कंपनीने हिंदुस्थानात आयोजिलेल्या २०१७ च्या फिफा अंडर-१७ फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने शालेय स्तरावर ‘मिशन इलेव्हन मिलियन’ फेस्टिव्हल हा फुटबॉल प्रसाराचा उपक्रम आयोजित केला आहे. या फेस्टिव्हलच्या अंधेरीतील उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, आदिदासचे तांत्रिक सल्लागार रूनियो अफोलाबी, बॉलीवूड स्टार अभिषेक बच्चन, दिनो मोरिया हे मान्यवर उपस्थित होते.

शाळकरी मुलांसोबत पुयोलने घेतला खेळण्याचा आनंद
मुंबईतील विविध शाळा व शैक्षणिक संघटनांचे ५०० विद्यार्थी ‘मिशन इलेव्हन मिलियन’ फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. याप्रसंगी शहाजी राजे क्रीडा संकुलात ‘सुपरस्टार’ फुटबॉलपटू पुयोलने शाळकरी मुलांसोबत खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी त्याने काही महत्त्वपूर्ण टीप्सही युवा फुटबॉलपटूंना दिल्या. यावेळी एमडीएफए चेअरमन आदित्य ठाकरे मुंबईत फुटबॉल विकासासाठी घेत असलेल्या पुढाकाराबद्दल व मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम साकारल्याबद्दल आदित्य ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. हिंदुस्थानला फुटबॉल क्षेत्रात बलवान करायचे असेल तर तळागाळातून फुटबॉल विकास कार्यक्रम राबवायला हवेत, असे प्रतिपादनही फुटबॉल लिजेंड पुयोलने केले.