चिली चिझ सॅण्डविच

हल्ली सॅण्डवीच वाल्यांकडे सॅण्डवीचचे बरेचसे प्रकार मिळतात. त्यात चिली चिझ सॅण्डविच हा प्रकार बऱ्याच जणांना आवडतो. हा प्रकार घरात बनवणं अगदी सोप आहे. बाहेर या सॅण्डवीचसाठी आपल्याला ४० ते ५० रुपये मोजावे लागतात. पण तेवढय़ाच पैशात आपल्या घरातील चार माणसे पोटभर चिली चिझ सॅण्डवीच खाऊ  शकतात.

साहित्य… बारिक चिरलेली भोपळी मिरची, बारिक चिरलेला कांदा, ब्रेड, बटर, कोथिंबीर, मीठ, कोथिंबीर पुदिना चटणी, चीझ.

कृती… एका भांडय़ात बारिक चिरलेली भोपळी मिरची, बारिक चिरलेला कांदा समप्रमाणात घ्या. त्यात थोडीशी कोथिंबीर, थोडा बटर, चवीनुसार मीठ आणि भरपूर चीझ किसून टाका. हे मिश्रण हाताने चांगले एकजीव करा. दोन ब्रेडच्या एका बाजूला बटर लावून घ्या. त्यावर आवडीनुसार पुदिन्याची चटणी लावा. एका ब्रेडवर वरील मिश्रण ठेवा व त्यावर दुसरा ब्रेड ठेवून दाबा. हे सॅण्डवीच टोस्टरमध्ये ठेवा व चांगले टोस्ट करुन घ्या. सर्व्ह करतेवेळी वरुन चिझ किसून टाका. टोस्टर नसल्यास तुम्ही गरम तव्यावर थोडा बटर टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊ शकता. ओरेगानो, हर्ब्सचाही वापर करु शकता.