दररोज तीन किलो मिरच्या खाणारा ‘चिली मॅन’

सामना ऑनलाईन । भोपाळ

मिरचीचं नुसतं नाव जरी काढलं तरी कित्येक लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. पण, मध्य प्रदेशातल्या करनावद या गावात एक असा बहाद्दर आहे ज्याला मिरची खाण्याचं व्यसन आहे. या माणसाला रोज ३ किलो मिरच्यांचा खुराक लागतो.

‘प्यारे मोहन’ असं या मिरची खवैय्याचं नाव आहे. या माणसाचं वय ४० वर्षं असून त्याला तीन मुलं आहेत. गेल्या सहा वर्षांत तो एकदाही आजारी पडलेला नाही आणि याचे श्रेय तो मिरची खाण्याच्या सवयीला देतो. त्याला सहा वर्षांपूर्वी मिरच्या खाण्याचा छंद लागला आणि आता तो मिरच्यांशिवाय काहीच खात नाही. मिरच्या खाल्ल्यानंतर कित्येक तास त्याला पाणी किंवा साखरेची गरज पडत नाही.

मिरची हिरवी असो किंवा लाल भडक असो, मला ती गोडच लागते, असं प्यारे मोहन म्हणतो. अगदी काळी मिरीही त्याला वर्ज्य नाही. त्याच्या या सवयीमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली असून त्याला ‘चिली मॅन’ असं नावही मिळालं आहे.