दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला झाला आहे. केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने मिरची पावडरने हल्ला चढवला. दिल्ली सचिवालयात जात असताना हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी हल्लेखोर व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याचे नाव अनिल कुमार शर्मा असल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली सचिवालयात जात असतानाच अचानक एका तरुणाने काडीपेटीच्या बॉक्समधून आणलेली मिरची पावडर त्यांच्यावर फेकली. या दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमध्ये केजरीवाल यांचा चष्माही तुटला. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून त्याने गोळीबाराची धमकी दिल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

दिल्ली पोलिसांच्या कारभारावर पुन्हा प्रश्न
अनिल शर्मा सचिवालयाच्या आत मिरची पावडर घेऊन कसा पोहोचला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा भेदण्यात तो यशस्वी झाल्याने दिल्ली पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून आता राजकारण सुरू झाले असून आपने भाजप सरकारवर याचे खापर फोडले तर भाजपने हा प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचे म्हटले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाला आहे. यापूर्वी त्यांच्यावर शाईफेक, चप्पल फेकल्याचा प्रकारही घडला होता.