ड्रॅगनचे शेपूट वाकडेच, म्हणे हिंदुस्थानी सैन्य अतिआक्रमक

सामना ऑनलाईन । बीजिंग

डोकलाममध्ये चिनी ड्रॅगन सातत्याने खोड्या काढत असल्याने हिंदुस्थाननेही चिन्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानच्या या मुत्सद्देगिरीला चीनने अतिआक्रमक म्हटले आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) एका निवेदनाद्वारे, हिंदुस्थानी सैन्य सीमारेषेवर अतिआक्रमक होत असल्याचा आरोप केला आहे. हिंदुस्थानने आपल्या सैन्यावर नियंत्रण ठेवण्याचा आगाऊ सल्लाही चीनने दिला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या पीएलएने सैन्याच्या आक्रमकतेबाबत हिंदुस्थानी उच्च अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवला होता. डोकलाममध्ये सीमेवरील गस्तीदरम्यान हिंदुस्थानी लष्करासोबत झालेल्या वादावेळी आमचे सैनिक जखमी झाले होते, असा कांगावा चीनने केला आहे. हिंदुस्थानी जवान चिनी सीमेवर पाकिस्तानची सीमा असल्याप्रमाणे अतिआक्रमकपणे वागतात, असेही चीनने म्हटले आहे. चीनकडून करण्यात आरोपांना हिंदुस्थानी सैन्याने केराची टोपली दाखवत हे आरोप फेटाळून लावले आहेत. हिंदुस्थानी सैन्य देशाचे रक्षण करण्यास प्रतिबद्ध आहे. सीमारेषेवर हिंदुस्थानी जवानांनी नाही तर चीनच्या पीएलएने आक्रमक पावित्रा स्वीकारला होता, असे हिंदुस्थानी लष्कराने स्पष्ट केले आहे.

याआधी गेल्यावर्षी डोकलाममध्ये चीनकडून सुरू असलेल्या रस्तेबांधणीला हिंदुस्थानी सैन्याने जोरदार विरोध केला होता. दोन्ही देशांचे सैन्य तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यानंतर नियंत्रण रेषेवर शांतता राखण्यासाठी हिंदुस्थान आणि चीनमध्ये विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा झाली. दीर्घ चर्चेनंतर सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात आणणे दोन्ही देशांना शक्य झाले. मात्र हिंदुस्थान आणि चीनमध्ये सीमावाद असला तरी दोन्ही देशात ४० वर्षांत एकदाही गोळीबाराची घटना घडलेली नाही.