चीनची आडकाठी, हिंदुस्थानकडे मागितले मसूद अजहरविरोधात पुरावे

china-flag-new

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहरविरोधात हिंदुस्थानाने आधी पुरावे द्यावेत. हे पुरावे योग्य वाटले तरच आम्ही त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याला पाठिंबा देऊ, अशी आडमुठी भूमिका चीनने घेतली आहे. त्यामुळे काही झाले तरी चीन मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आडकाठी आणत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा आपली आडमुठी भूमिका जाहीर केली. ते म्हणाले, ‘मसूद अजहरबद्दलची चीनची भूमिका कायम आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या 1267 समितीच्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे. याबाबत सर्व सदस्य देशांना स्वीकारार्ह असतील आणि ज्याद्वारे समस्येवर तोडगा निघेल असे पुरावे असायला हवेत.’

पुलवामा हल्ला तसेच अनेक दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी हिंदुस्थान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत जोरदार प्रयत्न करत आहे, मात्र प्रत्येक वेळी चीन त्यात खोडा घालत आहे. आजही सुरक्षा परिषदेत अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन प्रस्ताव आणणार आहे. इतर सदस्य देशांकडे यावर सूचना मागवण्यात येणार आहे.

अजहरला आताच आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा – अमेरिका
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आताच आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे हिंदुस्थानी उपखंडासाठी चांगले ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरण्यासाठी आवश्यक असलेले सर्व मापदंडांमध्ये तो बसतो. ते फसले तर त्यामुळे हिंदुस्थानी उपखंडाला धोका आहे. या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही, असेही अमेरिकेने चीनला ठणकावले आहे.

आज मुदत संपली
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या 1267 समितीनुसार 27 फेब्रुवारीला फ्रान्स, अमेरिका आणि अमेरिकेद्वारे मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठीचा प्रस्ताव मांडला असून त्याची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये शांतता राहणे हिंदुस्थानी उपखंडासाठी आवश्यक असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.

तीन वेळा प्रस्ताव रोखला
त्या आधीही तीन वेळा चीनने प्रस्तावाला विरोध केला होता. चीन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मतांची ताकद असलेला सदस्य देश आहे. त्यामुळे चीनच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.