चिनी ड्रॅगन आता सौरउर्जा ओकणार; ब्रिटनला टाकले मागे!

सामना ऑनलाईन । बीजिंग

जगात चीनमध्ये सर्वाधिक सौरउर्जा वापरली जाते. चीनमध्ये सुमारे 130 गीगावॅट (13 हजार कोटी किलोवॅट) सौरउर्जेची निर्मिती करण्यात येते. ब्रिटनच्या उर्जेची गरज सहज भागेल एवढी सौरउर्जा चीनमध्ये तयार होते. प्रदूषण कमी करून अपारंपारिक उर्जास्रोतांचा वापर करण्यावर चीनचा भर आहे. मात्र, भोगौलिक आणि तांत्रिक अडचणींमुळे सौरउर्जा वापरणे खार्चिक होत आहे. असे असूनही चीन जगात सर्वाधिक सौरउर्जा वापरणारा देश ठरला आहे.

तेंगर वाळवटांत चीनने सर्वात मोठा सौर प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून 1500 मेगावॅट वीजनिर्मिती होते. तिबेटच्या पठारावर उभारण्यात आलेल्या 850 मेगावॅटच्या प्रकल्पात 40 सौरउर्जेचे पॅनल बसवण्यात आले आहे. उत्तर आणि वायव्य चीनमध्ये सूर्यप्रकाश मुबलक आहे. त्याचा वापर करण्यासाठी चीनने या भागात मोठ्या प्रमाणात सौर प्रकल्प उभारले आहेत. जगात वापरण्यात येणाऱ्या सौरउर्जा पॅनेलपैकी सुमारे 60 टक्के पॅनलची निर्मिती चीनमध्ये करण्यात येते.

चीनमध्ये वापरण्यात येणाऱ्या उर्जेपैकी 2/3 उर्जा कोळशातून निर्माण करण्यात येते. राजधानी बिजींगसह अनेक शहरात प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी चीन कोळशाचा वापर कमी करून उर्जानिर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहे. चीनच्या पूर्वेकडील भागात 94 टक्के लोकसंख्या राहते. तर पश्चिमेकडील भागात फक्त 6 टक्के लोकसंख्या आहे. त्यामुळे देशाच्या पश्चिम भागात चीनने मोठ्या संख्येने सौरप्रकल्प उभारले आहेत. कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी प्रकल्प उभारून या भागात औद्योगिक प्रकल्पांना चालना देऊन या भागांचा विकास करण्याचा चीनचा उद्देश्य आहे. अशा प्रकारे चीनने सौरउर्जा प्रकल्प उभारल्यास 2020 पर्यंत उर्जेसाठीचे कोळशावरील त्यांचे अवलंबित्व कमी होणार आहे.

चीन जगातील सर्वात जास्त सौरउर्जा वापरणारा देश असला तरीही सौरउर्जानिर्मितीत त्यांच्यासमोरही अनेक अडथळे आहेत. अनेक प्रकल्पांमध्ये क्षमतेएवढी उर्जा निर्माण होत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच शहरे आणि लोकवस्तीपासून प्रकल्प लांब असल्याने वीज वाहून आणण्याचा खर्च वाढतो. तसेच भौगौलिक स्थिती आणि वातावरणातील बदलांमुळेही उर्जानिर्मितीवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. आर्थिक अडचणीमुळे सरकारने मोठ्या सौरप्रकल्पांना अनुदान देणे बंद केल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.