जम्मू कश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हिंदुस्थानचेच; चीनने केले मान्यता

3

सामना ऑनलाईन । बीजिंग

अरुणाचल प्रदेशवर दावा सांगणाऱ्या चीनने नमती भूमिका घेत अरुणाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले आहे. अरुणाचल प्रदेश आपला भाग असल्याची चीनची भूमिका होती. त्यांच्या लष्कराने या भागात घुसखोरीही केली होती. त्यामुळे हिंदुस्थान आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता चीनने नमते घेतले आहे. बीजिंगमध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह परिषदेत चीनने बीआरआय मार्गांचे नकाशे दाखवले. या नकाशांमध्ये जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हिंदुस्थानचे भाग दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे जम्मू कश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हे हिंदुस्थानचे अविभाज्य भाग असल्याचे चीनने मान्य केले आहे.

china-map-1

या नकाशांमध्ये हिंदुस्थान बीआरआयचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. तीन दिवसांच्या बीआरआय परिषदेत चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने हे नकाशे प्रदर्शित केले. चीनने जम्मू कश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हिंदुस्थानचे अविभाज्य भाग दाखवत नमती भूमिका घेतली आहे. तसेच हिंदुस्थानचा या प्रकल्पाला विरोध असूनही त्यात हिंदुस्थानचा समावेश करण्यात आला आहे. चीनने याआधी अरुणाचल प्रदेश हिंदुस्थानचा भाग दाखवणारे अनेक नकाशे नष्ट केले होते. हा चीनचा भाग असल्याचा दावा वारंवार चीनने केला आहे. अरुणाचल प्रदेशला हिंदुस्थानातील राजकीय नेते आणि दलाई लामा यांनी दिलेल्या भेटीचाही चीनने निषेध केला होता. तसेच जम्मू कश्मीर हा पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा भाग असल्याचा दावाही चीनने अनेकदा केला होता. त्यामुळे चीनने बदलेलेल्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच त्यांनी मुद्दाम ही रणनीती आखल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.