संरक्षणमंत्र्यांच्या अरुणाचल दौऱ्यावर ड्रॅगनचे लाल फुत्कार

सामना ऑनलाईन । बीजिंग

निर्मला सीतारमण यांनी रविवारी अरुणाचल प्रदेशमधील चीनच्या सीमेलगत असणाऱ्या सुदूर अंजा जिल्ह्याचा दौरा केला. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तिळपापड झाला आहे. संरक्षणमंत्री सीतारमण यांचा वादग्रस्त भूमीचा दौरा दोन्ही देशाच्या शांततेसाठी घातक असल्याचे चीनकडून म्हणण्यात आले आहे.

सीमेवरील लष्करी तयारीचा आढावा घेण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी रविवारी अरुणाचलमधील सुदूर अंजा जिल्ह्याचा दौरा केला होता. त्याला विरोध दर्शवत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनिंग म्हणाले की, ‘हिंदुस्थान आणि चीन यांच्यातील पूर्व सीमेवरुन सध्या वाद सुरू आहेत. असे असताना हिंदुस्थानच्या संरक्षण मंत्र्यांनी या भागाचा दौरा करणे हे शांततेला अनुकूल नाही.’

‘आम्हाला आशा आहे की सीमावाद चर्चेने सोडवण्यासाठी हिंदुस्थान चीनच्या प्रयत्नांना मदत करेल. तसेच सीमावाद सोडवण्यासाठी हिंदुस्थानला चीनसोबत चर्चा करायला हवी. त्यामुळे हा वाद न ताणता चर्चेने सुटू शकेल. त्यासाठी तसे वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे. आम्हाला आशा आहे हिंदुस्थान चीनला साथ देईल, असेही चुनिंग म्हणाले.

चीनकडून सातत्याने अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा भाग असल्याचा पोकळ दावा करण्यात आला आहे. मात्र चीनच्या या दाव्याला हिंदुस्थान नेहमीच केराची टोपली दाखवत असल्याने चिनी ड्रॅगनने विरोधाचे लाल फुत्कार सोडले आहेत.