चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून, धकाधकीच्या वेळापत्रकाचे खेळाडूंसमोर आव्हान


सामना ऑनलाईन । चँगझू

चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होत असून याप्रसंगी पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बि श्रीकांत या हिंदुस्थानी खेळाडूंसमोर धकाधकीच्या वेळापत्रकाचे खडतर आव्हान असणार आहे. याचसोबत सायना नेहवाल, एच.एस. प्रणॉय या हिंदुस्थानी खेळाडूंच्या कामगिरीवरही तमाम बॅडमिंटनप्रेमींच्या नजरा खिळल्या असतील.

23 वर्षीय पी.व्ही. सिंधूने गेल्या काही महिन्यांत उल्लेखनीय कामगिरी केलीय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, वर्ल्ड चॅम्पियनशिप व आशियाई क्रीडा स्पर्धा या तिन्ही महत्त्वांच्या स्पर्धांमध्ये तिने रौप्य पदक जिंकलेय. मात्र सुवर्ण पदकाने तिला सातत्याने हुलकावणी दिली. एवढेच नव्हे तर इंडिया ओपन व थायलंड ओपन या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम फेरीतही तिने धडक मारली.

गेल्या आठवडय़ात झालेल्या जपान ओपनमध्ये तिला दुसऱ्या फेरीतच गारद व्हावे लागले. गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या डेन्मार्क ओपननंतरची ही तिची वाईट कामगिरी ठरलीय. आता सातत्याने होणाऱ्या स्पर्धांचा परिणाम तिच्या कामगिरीवर होताना दिसत आहे. पहिल्या फेरीत तिला हाँगकाँगच्या च्युंग ईचा सामना करावयाचा आहे. बघूया चायना ओपनमध्ये ती कसा खेळ करते ते…

सायना नेहवाल व पी.व्ही. सिंधू यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवल्यास उपांत्यपूर्व फेरीत दोघींचा सामना होऊ शकतो.
किदाम्बी श्रीकांत याला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा वगळता या वर्षी आपला ठसा उमटवता आलेला नाही. त्यांच्या कामगिरीवर सातत्याचा अभाव दिसून येतो. एच.एस.प्रणॉयला सलामीच्या लढतीत हाँगकाँगच्या लाँग एन्जसचा सामना करावा लागणार आहे.

दुहेरीत या जोडींवर मदार
महिला दुहेरीत हिंदुस्थानची मदार अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी या जोडीवर असेल. तसेच पुरुषांच्या दुहेरीत सात्विक रेड्डी व चिराग शेट्टी आणि मनू अत्री – सुमीत रेड्डी यांना आपली चमक दाखवावी लागणार आहे. मिश्र दुहेरीत सात्विक रेड्डी, अश्विनी पोनप्पा व प्रणव चोप्रा – सिक्की रेड्डी यांच्यावर भवितव्य अवलंबून असणार आहे.

summary- china open badminton championship starts from today