सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

हिंदुस्थान आणि चीन मध्ये बऱ्याच काळापासून सुरू असलेला सीमावाद मिटण्याची चिन्ह दिसत नाहीत. आयटीबीपीच्या अहवालानुसार चीनने ऑगस्टमध्ये तीन वेळा घुसखोरी केली. मात्र हिंदुस्थानच्या जवानांपुढे त्यांचे काही चालले नाही अखेर त्यांना माघार घ्यावी लागली. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होत असताना सीमेवर चिन्यांची अशी घुसखोरी सुरू होती.

चीनने उत्तराखंडच्या बाराहोती भागात ६ ऑगस्ट, १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट रोजी घुसखोरी केली होती. यावेळी चीनच्या पीएलए (PLA)चे जवान आणि काही नागरिक बाराहोतीच्या रिमखिम पोस्टजवळ दिसले. आयटीबीपीच्या रिपोर्टनुसार चीनी सैनिक हिंदुस्थानच्या सीमा रेषेपासून सुमारे 4 किमी आतपर्यंत शिरले होते. आयटीबीपीच्या प्रचंड विरोधानंतर चीनी सैनिक आणि नागरिक माघारी फिरले.

दरम्यान, चीन आणि हिंदुस्थानमध्ये डोकलामवरून वाद झाला होता. त्यावेळी 72 दिवस हिंदुस्थानी आणि चिनी सैन्य एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. मात्र चर्चेतून तो वाद सोडवण्यात आला होता. दोन्ही देशांमध्ये सीमा वाद हा कायमच होत आला आहे.