चिंचपोकळीचे चिंचोळे जिनेही सावज शोधताहेत! अंधारातून करावी लागते प्रवाशांना वाटचाल

सामना प्रतिनिधी, मुंबई

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकातील अरुंद पुलावरील जिन्यावर चिरडून निष्पापांचे बळी गेले. चिंचपोकळी स्थानकातील चिंचोळे जिनेही सावज शोधत आहेत की काय अशी परिस्थिती आहे. फलाटावरून पुलावर नेणारे जिनेही चिंचोळे आणि वरचे पूलही चिंचोळे आहेत. त्यातून लाखोंची गर्दी दररोज जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करत असते. चिंचपोकळी स्थानकातील जिने आणि वरचे पूल यांचे रुंदीकरण झाले नाही तर कोणत्याही क्षणी ही गर्दी तिथे गुदमरेल अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

चिंचपोकळी हे ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानक आहे. रोज हजारो प्रवासी तेथून प्रवास करतात. काळाच्या ओघात तिथे फलाटाची लांबी वाढली. फलाटावरून बाहेर पडण्यासाठी एक जिना वाढवला गेला, पण त्यांची रुंदी प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येच्या तुलनेत नगण्य आहे. स्थानकातून बाहेर पडण्यासाठी दोन मार्ग आहेत. मुख्य तिकीटघराकडून बाहेर पडणारा स्लोपच्या मार्गावर गर्दीच्या वेळी प्रवाशांना स्थानकाबाहेर पडण्यास दहा मिनिटे लागतात. तेथून बाहेर पडल्यानंतर प्रवासी सुटकेचा नि:श्वास सोडतात.

दुसरा मार्ग हा भायखळ्याच्या दिशेला आहे. एका चिंचोळ्या जिन्यावरून तो वरच्या पुलाला जोडतो. वरचा पूलही चिंचोळाच आहे. फलाटावर एक लोकल येवो किंवा एकावेळी दोन येवोत, या जिन्यावरून फक्त दोन-तीन प्रवासीच एकावेळी वर-खाली येऊ शकतात. त्यातच लोकल पकडण्यासाठी धावपळ झाली तर गर्दी होऊन अपघात होणे टाळताच येणार नाही. वेगाने होणाऱ्या आधुनिकीकरणामुळे ना. म. जोशी मार्ग, काळाचौकी, भायखळा, सातरस्ता, लालबाग या चिंचपोकळी स्थानकापासून जवळ असलेल्या भागांमध्ये कॉर्पोरेट कार्यालये वाढली. त्यामुळे तिथे कामाला येणाऱ्या प्रवाशांची संख्याही अनेक पटीने वाढली आहे. त्या तुलनेत चिंचपोकळी स्थानकाचा मात्र आवश्यक विकास झालेला नाही.

पूल रुंद करा
येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना सोयिस्कर व्हावे म्हणून जिने आणि पुलांची रुंदी वाढवली पाहिजे. भायखळ्याच्या दिशेचा जिना हा अगदीच अरुंद असल्याने महिला, वृद्ध यांना बराच त्रास सहन करावा लागतो. – शुभा जोशी

अंधार दूर करा
स्थानकातून बाहेर पडल्यानंतर आर्थर रोडच्या दिशेने उतरणाऱया मागच्या जिन्यावर रात्री दिवे नसतात. प्रवाशांना अंधारातून जावे लागते. तो अंधार प्रवाशांसाठी धोकादायक आहे. – अभिजित घाडी

तिकीटघर बंदच
स्थानकातील मागच्या बाजूला असणारे तिकीटघर हे क्वचितच उघडे असते. त्यामुळे तिकीट घेण्यासाठी प्रवाशांना बाहेरून १५ मिनिटांचे मोठे वळण घेऊन मुख्य तिकीटघराकडे जावे लागते. – दादा हरळे