टार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले

4

सामना ऑनलाईन । बीजिंग

सध्याच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जगामध्ये कंपनीकडून मिळणारे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचारी जीवाचे रान करताना दिसतात. कारण दिलेले काम व्यवस्थिती आणि मिळालेल्या वेळेत पूर्ण केले तर तुम्हाला पदोन्नती आणि पगारवाढ होताना याचाही फायदा मिळतो. काही वेळा दिलेले काम वेळेत पूर्ण नाही झाले तर कर्मचाऱ्यांनी थोड़्याफार शिक्षाही मिळतात, परंतु याबाबतीत चीनमधील एका कंपनीने सगळी हद्द पार केली आहे. कर्मचाऱ्यांना दंड देताना या कंपनीने माणुसकीच्या तत्वांवर कुऱ्हाड चालवली.

चीनमधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांनी शिक्षा म्हणून भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले. यात त्यांनी पुरुष आणि महिला कर्मचारी असा कोणताही भेदभाव केला नाही. महिला कर्मचाऱ्यांनाही गुडघ्यावर बसून रस्त्यावर चालण्यात जबरदस्ती केली. कर्मचारी गुडघ्यावर बसून चालत असताना त्यांच्या पुढे कंपनीचे झेंडे नाचवण्यात आले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या कंपनीबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, हा सर्व प्रकार भर रस्त्यात सुरू असताना कोणीही त्यांना वाचवण्याचा किंवा मदतीचा हात दिला नाही. परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हे अमानवीय कृत्य बंद झाले. तसेच चौफेर टीका झाल्यानंतर या कंपनीला टाळे ठोकण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे दंड देण्याचा चीनमधील हा पहिलाच प्रकार नाही. याआधी देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ कंपनीची मालकीन कर्मचाऱ्यांना रांगेत उभे करून कानशिलात लगावताना दिसली होती.