पाकड्यांनी दिली हिंदुस्थान-चीन युद्धाची खोटी बातमी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सिक्कीम जवळ हिंदुस्थान-चीन युद्धाचा भडका उडाला आहे. चिनी रॉकेटच्या हल्ल्यात १५८ हिंदुस्थानी सैनिक शहीद झाले आहेत; अशा स्वरुपाची बातमी पाकिस्तानमधील दुनिया न्यूज या उर्दू वृत्तवाहिनीने दिली. ही बातमी खोटी असून हिंदुस्थान-चीन दरम्यान युद्धाचा भडका उडालेला नाही असे वृत्त चिनी वृत्तपत्राने दिली आहे. चीनमधील पीपल्स डेली ऑनलाईनने पाकड्यांनी खोटी बातमी दिल्याचे वृत्त दिले आहे. चिनी मीडियाच्या बातमीमुळे पाकडे हिंदुस्थानविरोधात किती खोटा प्रचार करतात याची आणखी एक झलकच मिळाली आहे.

दुनिया न्यूज या उर्दू वृत्तवाहिनीने बातमी दिल्यानंतर थोड्याच वेळात स्वतःच्या वेबसाईटवर हिंदुस्थान-चीन युद्धाचे फोटो प्रसिद्ध केले. मात्र हे फोटो म्हणजे जगात अन्यत्र सुरू असलेल्या लढाईतील फोटो असून आधुनिक तंत्राच्या मदतीने त्यात थोडे बदल करण्यात आले आहेत, असे चिनी मीडियाने स्पष्ट केले. पाकड्यांनी प्रसिद्ध केलेले फोटो बनावट असून युद्ध सुरू नसल्याचे हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही स्पष्ट केले आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीची बातमी तथ्यहीन, बनावट, धादांत असत्य आहे; असे हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बगले यांनी सांगितले.