चिंतामणी कुलकर्णी

1

टिटवाळा हे महागणपतीचे ठिकाण म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ३० वर्षांपूर्वी चिंतामणी कुलकर्णी यांनी याच ठिकाणाहून सामाजिक कार्याचा श्रीगणेशा सुरू केला. ग्रामीण भागात वाचनसंस्कृती रुजावी, येथील रसिकांनादेखील विविध व्याख्याने, कविसंमेलने याचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने कुलकर्णी यांनी १९९२ मध्ये ‘जनप्रबोधिनी’ या संस्थेची स्थापना केली. गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुभाष जोशी, दादा विसपुते, श्रीकांत देवधर, विवेक पुराणिक, प्रवीण पंडित आदींच्या सहकाऱयाने सार्वजनिक वाचनालय सुरू केले. केवळ पुस्तकांची देवाण-घेवाण नव्हे तर या पुस्तकांचे लेखक, साहित्यिक यांना जवळून बघण्याचे भाग्य कुलकर्णी यांच्यामुळे टिटवाळावासीयांना मिळाले. कविवर्य शंकर वैद्य, मंगेश पाडगावकर, अशोक नायगावकर, नारायण सुर्वे यांच्या काव्यमैफली अजूनही अनेकांच्या लक्षात आहेत. संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक दाजीशास्त्री पणशीकर यांची महाभारतावरील दहा दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात कुलकर्णी यांचा मोठा वाटा होता. पुढे दाजीशास्त्रींबरोबर साहित्यिक तसेच धार्मिक उपक्रमांचेदेखील जनप्रबोधिनीच्या वतीने यशस्वीपणे आयोजित केले. त्याशिवाय पर्यटनविषयक उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका अद्यापही सुरू आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये टिटवाळय़ाचा झपाटय़ाने विकास झाला. मराठी माणसांनी जास्तीत जास्त वाचन करून आपले आयुष्य समृद्ध करावे यासाठी चिंतामणी कुलकर्णी यांनी अखेरच्या श्वासापर्यंत विविध उपक्रम राबवले. जनप्रबोधिनीचे कुलकर्णी यांचे कार्य पुढे सुरू ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे.