चला गोव्याला नाताळ साजरा करायला

2

>>स्वप्नील साळसकर<<

गोव्याचा नाताळ वैशिष्टय़पूर्णहा सण सुशेगाद ८-१० दिवस साजरा केला जातो.

पर्यटनासाठी गोवा जगाच्या नकाशावर आहे. त्याचप्रमाणे नाताळ उत्सवासाठी विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात जसा दिवाळीचा सण तसा गोव्यात ख्रिसमस मोठा उत्सव. सोमवारी या उत्सवाला सुरुवात झाली असून ८ जानेवारीपर्यंत विविध उपक्रमांनी ख्रिस्ती बांधव तो साजरा करणार आहेत. याचबरोबर फराळ, भेटवस्तू, विविध उपक्रम, स्पर्धा राबविल्या जाणार आहेत.

महाराष्ट्रात दिवाळीअगोदर घराघरांत खमंग फराळाचा सुगंध दरवळतो तसाच प्रकार गोव्यात आठ दिवस अगोदर पाहायला मिळतो. ‘बिबिन्का’ हा मैदा, अंडे आणि तूप यांपासून बनवलेला पदार्थ, ‘डोडोल’  हा नारळाचा रस, गूळ टाकून तयार केलेला गोड पदार्थ, रवा, खोबरे आणि साखरेपासून तयार झालेला ‘गोल’, चण्याची डाळ वापरून तयार केलेला शंकरपाळीच्या आकाराचा ‘डोस’ याशिवाय पिनाग्रा असे बरेच फराळाचे पदार्थ पोर्तुगीज काळातील आहेत आणि आजही गोव्यात ते तयार केले जात आहेत.

ख्रिसमस ट्री, चांदणी, तोरणे लावून घरांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. पुढील १३ ते १४ दिवस युथ ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी डान्स स्पर्धा, म्युझिक शो, त्रियात्र (कोकणी नाटकाचे) कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. पूर्वीच्या बॅण्डपथकाची जागा आता डी. जे. आणि ट्रान्स म्युझिकने घेतली आहे. एकमेकांना शुभेच्छा देतानाच शहरातील प्रत्येकाला घरी स्नेहभोजनासाठी बोलावले जाते. मटण, चिकन, मासे या स्पेशल डिशही असतात. रम केक येथील खासियत आहे.

गोव्यातील पर्यटकांना रेशाद मसाल्यातील मच्छी जेवण खूप आवडते. ख्रिश्चन बांधवांमध्ये ४०० वर्षांपूर्वीपासून हा मसाला तयार केला जातो. अन्य कोणालाही हा मसाला तयार करण्याची पद्धतही माहीत नाही. आंबट-तिखट-गोड अशा तिहेरी चवीने तयार केला जाणारा मसाला चिकन आणि मासे तयार करण्यासाठी वापरला जातो. नाताळ उत्सवात याच मसाल्याचा मोठय़ा प्रमाणात वापर करून मांसाहारी जेवण केले जाते आणि ते पर्यटकांच्याही पसंतीस उतरले आहे. सोमवारी जुने गोवा या ठिकाणी सेंट फ्रान्सिस परिसरात मोठय़ा प्रमाणात ख्रिस्ती बांधव एकत्र आले. शुभेच्छांसह विविध उपक्रम राबवित त्यांच्या या नाताळपर्वाला सुरुवात झाली. सेंट फ्रान्सिस परिसरात असणारी वास्तू वर्ल्ड हॅरिटेज सेंटरमध्ये गणली जाते. आजही या ठिकाणी परदेशी पर्यटकांची रिघ मोठय़ा प्रमाणात असते.

थर्टी फर्स्टचे प्लॅनिंग सर्वत्र आखले जात असेल. गोव्यातील नाताळ उत्सवाबरोबरच पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले फोंडा तालुक्यातील धार्मिक स्थळे मंगेशी, म्हाळसा, शांतादुर्गा, रामनाथ तसेच केपे तालुक्यातील पाथरपा, चामडीसुर्ला येथील पांडवकालीन पुरातन शंकर मंदिरांना भेटी दिल्याच पाहिजेत. त्याशिवाय धारबांदोडा तालुक्यातील कुळे येथील दूधसागर धबधबा, फोंडय़ातील आदिलशहाच्या कालखंडातील साफा मस्जिद, गोव्याची राजधानी पणजी, उत्तर गोव्यातील बागा, कलंगुट, कांदोली आणि दक्षिण गोव्यातील कोलवा, पालोले, बेतालबाती यांसारखी बिचेस आहेतच.