किंग्ज इलेव्हनने विकत घेतल्यानंतर ख्रिस गेल दिसला पंजाबी पगडीत

सामना ऑनलाईन । मुंबई

आयपीएलच्या लिलावात पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. दुसऱ्या दिवशी देखील त्याच्यावर बोली न लागल्याने त्याला २ कोटींच्या बेस प्राईसमध्ये प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने विकत घेतले. मनमौजी स्वभावाच्या क्रिसने त्याच्या या नव्या टीमसाठी स्वत:चा लूक देखील बदलला आहे. ख्रिसचा एक फोटो किंग्ज इलेव्हन पंजाबच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून या फोटोत त्याने तो प्रतिनिधित्त्व करत असलेल्या पंजाबची शान असलेली पगडी घातली आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबने शेअर केलेल्या या फोटोत ख्रिसने सफेद रंगाची पगडी बांधली आहे. “या फोटोवरून असं दिसतंय की ख्रिस गेल त्याच्या आगामी पंजाब दौऱ्यासाठी तयार झाला आहे.” असे या फोटो सोबत शेअर करण्यात आले आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी ख्रिसची फिरकी घेत त्याला “गेला सिंग”, ” ख्रिसप्रीत सिंग गेल” “ख्रिसिंदर गेल” अशी नावे दिली आहे. या फोटोला आतापर्यंत २८ हजार लोकांनी लाईक केले आहे.

गेल्या काही महिन्यापासून चांगले प्रदर्शन करत नसल्यामुळे यंदाच्या आयपीएलच्या मोसमात ख्रिस गेल साठी कोणत्याही संघाने बोली लावली नाही. पहिल्या व दुसऱ्या दिवशीही गेल अनसोल्ड राहिला होता. मात्र लिलाव संपायच्या आधी किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला २ कोटीत विकत घेतले.