अंकीता जंगम प्रकरणाची सीआयडी चौकशी करणार,पोलीस निरीक्षकाच्या निलंबनाचेही आदेश

सामना ऑनलाईन, मुंबई

खेड तालुक्यातील ऐनवली-मोहाने येथील मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे भासवत हा गुन्हा दडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. हा मुद्दा गुरुवारी शिवसेना आमदांसह इतर आमदारांनी विधानसभेत उपस्थित केला. सभागृहातील सदस्यांच्या संतप्त भावना लक्षात घेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेची सीआयडीद्वारे चौकशी करण्यात येईल आणि खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्यात येईल अशी घोषणा केली.

२८ डिसेंबर २०१७ रोजी खेड तालुक्यातील ऐनवली-मोहाने इथल्या अंकिता जंगमचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर तिच क्रूरपणे हत्या करत मृतदेह कुडोशी गावातील नदीपात्रात फेकून देण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपांना अटक केली तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले होते. यातले पाचही आरोपी सध्या जामीनावार मुक्त आहेत.

शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी या मुद्दावर बोलताना सांगितले की मुलीवर अत्याचार आणि हत्या करून आरोपी एका स्विफ्ट कारमधून फरार झाले होते. या गाडीचा नंबर पोलिसांना देऊनही पोलिसांनी ही कार जप्त केली नाही. या प्रकरणातील एक आरोपी मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा असल्याने त्याला अटक केल्यानंतर लगेच सोडून देण्यात आलं इतकंच नाही तर अंकीताचा पोस्टरमॉर्टेम करणाऱ्या डॉक्टरनेही खोटा अहवाल दिला असून त्याच्यावरहीने कारवाई झाली पाहीजे अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.

हे प्रकरण दाबण्यासाठी पोलीस निरीक्षक, पोलीस उप-अधीक्षक  यांना एक कोटी रूपये दिल्याची चर्चा सुरु असल्याचं आमदार सुभाष साबणे यांनी सभागृहात सांगितलं.  दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस निरीक्षकास निलंबित करा अशी मागणी केली. या विषयावरून सगळ्या पक्षांचे आमदार संतप्त झाले होते. त्यांची मागणी बघता तालिका अध्यक्षांनी गृहराज्यमंत्री दीपक केरसकर यांना सदस्यांच्या भावना लक्षात घ्या अशी सूचना केली, यानंतर केसरकर यांनी या प्रकरणाची आठ दिवसात सीआयडी चौकशी सुरु केली केली जाईल आणि पोलीस निरीक्षकाला निलंबित केले जाईल अशे आश्वासन दिले. आंदोलकांशी चर्चा न करता त्यांच्यासमोर निघून जाणारे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक यांना सौजन्याने वागण्याची समज देण्यात येईल असेही आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.