मॅनहोलमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू, सिडको अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

1
प्रातिनिधीक छायाचित्र

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

पनवेल येथील काळुंद्रे गावातील मॅनहोलमध्ये उतरलेल्या तीन कामगारांच्या मृत्युप्रकरणी सिडको अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यावर निष्काळजीपणामुळे मृत्युला कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना बुधवारी घडली. संतोष वाघमारे (40), प्रफुल्ल साबर (30) आणि विलास म्हसकर (60) हे तीन कामगार बुधवारी भूमिगत असलेल्या गटारात सफाईसाठी उतरले होते. तिथे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांची चौकशी केली. चौकशीअंती त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ते अभियंते कोण आहेत, ते पोलिसांनी उघड केलेलं नाही.

सिडकोतर्फे या प्रकरणाची अंतर्गत चौकशीही करण्यात येणार आहे. सखोल चौकशी केल्यानंतरच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया राताम्बे यांनी दिली आहे.