हाऊसफुल्ल : जाज्वल्य इतिहासाचा जिवंत अनुभव

3

>>वैष्णवी कानविंदेपिंगे<<

सिनेमा सुरू होतो… पडद्यावर मोठय़ा जमावाचं वाट पाहणं, उत्सुक चेहरे दिसतात. आता कोण येणार हे माहीत असूनही नकळत या पहिल्याच दृष्यात प्रेक्षक म्हणून आपल्याही मनात त्या उत्सुकतेचं बीज पेरलं जातं आणि त्यानंतर काही क्षणात बाळासाहेब ठाकरेंची पाठमोरी प्रतिमा दिसते. त्यांची शाल पांघरणं, रुद्राक्षांची माळ हातांनीच आश्वासन देणं आणि त्यानंतर एका बाजूने दिसणारा चेहरा हे पाहताच आपण पाहिलेल्या, अनुभवलेल्या बाळासाहेबांची आठवण येते आणि तिथूनच या व्यक्तिमत्त्वामुळे पुन्हा एकदा भारवण्याचा प्रवास सुरू होतो.

मुळात अख्ख्या महाराष्ट्राने ज्या इतिहासाला अनुभवलं तो इतिहास आणि तो इतिहास ज्यांनी घडवला ते बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सिनेमा येतोय म्हटल्यावरच उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि त्या उत्सुकतेला पुरेपूर न्याय देत साकार झालेला हा सिनेमानुभव प्रत्येक सिनेरसिकांनी अनुभवलाच पाहिजे. या सिनेमाची कथा म्हणजे व्यंगचित्रकार बाळ ठाकरे ते लोकनेते बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्याचं चित्रण, पण हा सिनेमा जरी बाळासाहेबांच्या आयुष्यावर असला तरीही तो केवळ चरित्रात्मक नाही. तो कालखंड, ते समाज परिवर्तन, त्या परिवर्तनाची गरज हे सगळंच या सिनेमाच्या निमित्ताने आपल्यासमोर उलगडतं. मुळात एखाद्याला नेता करता येत नाही तर त्याने जन्मच घ्यावा लागतो. तो कुठेही असला, काहीही करत असला तरीही त्याच्यातल्या नेतृत्वगुणांना आपोआपच वाट मिळत जाते आणि ‘ठाकरे’ सिनेमा पाहताना याच गोष्टीची सगळय़ात प्रथम जाणीव होते. या सिनेमात दाखवलेला प्रत्येक कालखंड घडत असताना जे प्रेक्षक साक्षीदार असतील त्यांच्यासाठी पडद्यावर त्या घटनांचा पुनर्प्रत्यय नक्कीच रोमांचक आहे आणि जी पिढी त्यांच्याबद्दल केवळ ऐकून आहे त्यांच्यासाठी तर हा एक स्तब्ध करणारा जिवंत अनुभव आहे.

बाळासाहेब ठाकरेंचं आयुष्य, त्यांचं कुटुंब, त्यांचं नेतृत्व, त्यांच्यातला कलाकार किंवा राजकीय नेता इत्यादी बाबींवर कालची पिढी तर जाणत होतीच. पण आजची पिढीदेखील ठामपणे बोलू शकेल इतकी या नेत्याची पाळमुळं महाराष्ट्रातल्या घरांमध्ये रुजली आहेत. त्यामुळे ठाऊक असलेल्या सगळय़ा गोष्टी जशाच्या तशा उभ्या करतानादेखील त्यातलं सिनेमाचं मूल्य जपणं, यातल्या व्यक्तिगत बारकाव्यांचे धागे अलगद गुंफणं हे कठीण होतं. पण या सगळय़ाची मांडणी इतकी चपखल झाली आहे की, ठाकरे हा सिनेमा एक कलाकृती म्हणून नक्कीच समाधान देतो.

बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दिकी या अभिनेत्याने साकारली आहे. ती इतकी चपखल उभी राहिली आहे की, सिनेमा पाहिल्यावर त्याच्याशिवाय अजून कुठच्याही कलाकाराचा या व्यक्तिरेखेसाठी विचारही करता येत नाही. केवळ शरीरयष्टीच किंवा चेहऱयात आणलेलं साधर्म्यच नाही तर नजरेतली जरब, त्यांचा आब, देहबोली आणि एकूणच त्या व्यक्तिमत्त्वाची प्रभा नवाजुद्दीनमुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा जशीच्या तशी अनुभवायला मिळते. त्यांचा आवाज, त्यांची भाषणं, बोलताना ते मध्येच करत असलेल्या नकला या सगळय़ाच गोष्टी कमाल उभ्या राहिल्या आहेत. एक प्रसंग आहे, ज्यात दादा कोंडके न्याय मागण्यासाठी बाळासाहेबांच्या कचेरीत येतात. तिथे अनेकजण असतात. दादा बोलता बोलता त्यांच्या लकबीप्रमाणे विनोद करतात. तेव्हा सगळे खदखदून हसतात. त्यावेळी गांभीर्य आणि तरीही त्यांच्या चेहऱयावर उमटणारं हसू हा व्यक्तिमत्त्वाचा पैलू नवाजुद्दीनने इतका सहज उभा केलाय की त्यासाठी त्याचं नक्कीच कौतुक केलंच पाहिजे. अशा अनेक प्रसंगांमधून उभं राहिलेलं बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तिमत्त्व इतकं अप्रतिम उभं करण्यात त्याच्यातल्या अभिनेत्याचा नक्कीच मोठा वाटा आहे. अमृता रावने उभारलेली मीनाताई ठाकरे यांची भूमिका, शिवाय प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण, मनोहर जोशी, इंदिरा गांधी, दत्ताजी साळवी, मोरारजी देसाई, प्रमोद नवलकर अशा प्रत्येक व्यक्तिरेखाच बेमालूमपणे उभ्या राहिल्या आहेत. अर्थात यासाठी रंगवेषभूषाकारांचंही तितकंच कौतुक केलं पाहिजे.

या सिनेमाचं अभिजित पानसे यांनी लिहिलेली पटकथा आणि त्यावर चढलेला दिग्दर्शनाचा साज याबद्दल स्वतंत्रपणेच बोललं पाहिजे. सिनेमा सुरू होतो तिथपासून ते संपेपर्यंत एकही क्षण सांडू न देता उभा केलेला हा सिनेमा म्हणजे उत्कृष्ट दिग्दर्शनाचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. या सिनेमामध्ये विविध महत्त्वाच्या कालखंडांची विभागणी केलीय. त्यामुळे ते कालखंड अधिक ठळकपणे आधी मनात उभे रहातात आणि नंतर तसेच्या तसे पडद्यावर उमटतात. खरं म्हणजे ज्यांचं व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांच्या मनात बिंबलंय अशा व्यक्तीचं चित्रण या पद्धतीने करणं कठीण असतं. त्यामुळे प्रेक्षकाच्या मनात आपोआपच तुलना होऊ शकते. पण याचाच वापर करून अभिजितने प्रेक्षकांच्या मनातल्या प्रतिमेला अधिक बळकट केलंय. बरं यात सुन्न करणारे, अंगावर काटा आणणारे प्रसंगही आहेत. पण ते इतक्या बेमालूमपणे पडद्यावर उमटतात त्याची विदारकता मनात उमटते, आपला श्वासही रोखला जातो, पण असह्य व्हावं असा अतिरंजितपणाचा मात्र लवलेशही नाही. उदाहरणार्थ, 93 सालच्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळचं दृष्य, दंगलीच्या वेळी घरं पेटवण्याचं जे सत्र सुरू झालं तो प्रसंग, लाठीमार आणि गाडीखाली तुडवले गेलेले शिवसैनिक… असे अनेक प्रसंग खिळवून ठेवतात. शिवसेनेची उभारणी, शिवसैनिकाच्या मनाची होत गेलेली जडणघडण, मनात पेट घेणारा अग्नी हा सगळा प्रवास खूप सहज उभा राहिलाय.

या सिनेमाचा मध्यांतराच्या आधीचा बहुतेक भाग कृष्णधवल रंगात साकारतो आणि मग मध्यांतराच्या वेळी या कृष्णधवल छटेतनं एकच झेंडूचं केशरी फूल पडद्यावर उमटतं. मध्यांतर कुठच्याही मोठय़ा प्रसंगावर न करता या रंगावर करण्याची शिताफी दिग्दर्शकाने खूप छान साकारली आहे. तर अनेक छोटे छोटे प्रसंगही सिनेमा संपला तरीही मनात घट्ट रुजून रहातात. दिवाळीच्या दिवशी जामिनावर सुटून आलेला शिवसैनिक आणि खिसा फाटलेला मुलगा आणि त्यानंतर त्याच्या घरचा प्रसंग, लाठीमाराच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाला स्वतŠ खांदा देणारे बाळासाहेब, व्यंगचित्र रेखाटत असताना घातपाताची बातमी येते तेव्हा त्या चित्रातल्या शाईमधनं उमटणारी मनातली घालमेल, परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन सुरू असतानाही दुधवाल्याला न्याय मिळवून देणारे बाळासाहेब,  हिंदू-मुस्लिम दंग्यानंतर मदत मागायला आलेल्या एका मुस्लिम माणसाला स्वतŠच्याच घरी नमाज पढायला सांगणारे बाळासाहेब, जावेद मियाँदादसोबतची क्रिकेटवरची चर्चा, कोठडीमधनं पत्नीला लिहिलेलं पत्र, पत्नीसोबत समुद्रकिनाऱयावरच्या वाळूत बसून गप्पा मारण्याचा साधा प्रसंग किंवा घरात वडिलांसोबत संघटना स्थापण्याबाबत होणारी सहज चर्चा, शिवसेनेची स्थापना, शिवाजी पार्कवरचा पहिला दसरा मेळावा, त्यावेळचं प्रबोधनकारांचं भाषण असे अनेक छोटे छोटे प्रसंग हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात उभे करतो. प्रेक्षक शिवसैनिक असो वा नसो पण ‘ठाकरे’ पहाणाऱया प्रत्येक सिनेमा रसिकासाठी बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्त्वाबद्दलचा आदर मात्र दुणावेल आणि सिनेमा म्हणून एक दर्जेदार अनुभवही नक्कीच वाटय़ाला येईल.

बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. त्याचाच वापर करून केलेली सिनेमाची सुरुवात आणि काही महत्त्वाचे प्रसंग चितारताना त्या लकबीचा केलेला बेमालूम वापर छान जमून आलाय. संवादही मस्त. बाळासाहेबांचे अनेक संवाद, अनेक वाक्यं प्रसिद्ध आहेतच. ते या सिनेमात जेव्हा कानावर पडतात तेव्हा मस्त वाटतं. शिवाय मराठी माणूस घाटी असेल पण घटीया नाही किंवा आपल्या माणसाची चौकशी नाही तर विचारपूस करावी अशा प्रकारचे अनेक छोटे, शब्दांशी खेळणारे संवाद या सिनेमाला साजेसे आहेत. सिनेमाला उठाव देणारं संगीत, रंगभूषा, वेषभूषा, आधीची मुंबई, नंतरची मुंबई… त्यातली टॉप अँगलने किंवा कानाकोपऱयातनं चित्रित केलेली दृष्यं. काळानुसार बदलणारे बारकावे या सगळय़ावरच सिनेमा उभा करताना घेतलेली मेहनत नक्कीच दिसून येते. बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्व आणि एकूणच कालखंड प्रेक्षकांच्या मनात पुन्हा जिवंत करणारा आणि ज्यांनी तो अनुभवला नसेल त्यांना त्याचा अनुभव देणारा हा सिनेमा येणं खरंच खूप गरजेचं होतं. कारण या सिनेमाच्या निमित्ताने केवळ व्यक्तिमत्त्वच नाही तर महाराष्ट्राच्या एका महत्त्वाच्या कालखंडाला जवळून जाणून घ्यायची संधी मिळते. एक उत्तम दर्जेदार कलाकृती पाहिल्याचा आनंद घेण्यासाठी ‘ठाकरे’ हा सिनेमा प्रत्येक सिनेरसिकाने अनुभवलाच पाहिजे.

>>>दर्जा

सिनेमा : ठाकरे

निर्माता : वायकॉम 18 मोशन पिक्चर्स, डॉ. श्रीकांत भसी, वर्षा राऊत, पूर्वशी राऊत, विधिता राऊत दिग्दर्शक : अभिजित पानसे  कथा : संजय राऊत  पटकथा : अभिजित पानसे  संवाद : अरविंद जगताप  संगीत : रोहन-रोहन  छायांकन् : सुदीप चॅटर्जी  कलाकार : नवाजुद्दीन सिद्दिकी, अमृता राव, मुकुंद गोसावी, चित्तरंजन गिरी, संजय नार्वेकर, अशोक लोखंडे, अवंतिका आकेरकर, संदीप खरे, प्रफुल्ल सामंत, सतीश आळेकर, प्रवीण तरडे, प्रकाश बेलवडी