चटपटीत आणि चुरचुरीत

<< परिक्षण >>    <<  मल्हार कृष्ण गोखले >>

चित्रपट हे दृश्य माध्यम आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या मूकपटांपासूनच चित्रपटांची लोकप्रियता वाढत गेली. १९३३ साली पहिला हिंदी चित्रपट ‘आलमआरा’ आला. म्हणजे आता त्या घटनेलाही ऐंशी वर्षे उलटून गेली आहेत. या सगळय़ा काळात हिंदी चित्रपट हा आपल्या सामाजिक जीवनाचा जणू एक अविभाज्य भागच बनून गेलेला आहे.

या प्रक्रियेत १९७२ या वर्षाला एक महत्त्व आहे. कारण त्या वर्षी मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले. मुंबई हीच आपल्या देशातली चित्रपट निर्मितीची पंढरी असल्यामुळे, सहाजिकच मुंबई दूरदर्शनवर चित्रपटविषयक कार्यक्रमांचीच रेलचेल होती.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तेव्हापासून पुढे सालोसाल दूरदर्शन वाहिन्यांची संख्या वाढतच गेली. त्या वाहिन्यांवरचे बहुसंख्य कार्यक्रम हिंदी चित्रपटांशीच संबंधित होते आणि आजही असतात.

योगायोग असा की, त्याच कालखंडात म्हणजे १९७२, ७३, ७४ या काळात हिंदी चित्रपटही एक वेगळे वळण घेत होता. त्या वळणाचा निदर्शक म्हणजे अमिताभ बच्चनचा अत्यंत गाजलेला चित्रपट ‘दीवार’ आज चाळीस वर्षें उलटलेयत, पण अमिताभच्या ‘दीवार’ची जनमानसावरची मोहिनी संपलेली नाही.

लोकप्रिय चित्रपट समीक्षक; नव्हे विश्लेषक, दिलीप ठाकूर यांचा प्रस्तुत ‘सिनेमा मसाला मिक्स’हा लेखसंठाह १९७४च्या ‘दीवार’वरील लेखानेच सुरू होतो.

१९७४ चे दीवार आणि जय संतोषी माँ; १९७५ चे आँधी आणि शोले; १९७७चा अमर, अकबर, अँथनी; १९७६चा घर; १९८०चे डॉन आणि शान; १९८१चे एक दूजे के लिये आणि सिलसिला, अशा अत्यंत गाजलेल्या आणि आजही चित्रपट शौकिनांच्या स्मरणात रुतून राहिलेल्या एकेका चित्रपटाचा आढावा घेत पुस्तक पुढे सरकत राहते.

ही रूढार्थाने समीक्षा नाही; चिकित्सा नाही; लेखकाने त्याला भावलेल्या चित्रपटांचे आस्वादक विश्लेषण इथे मांडले आहे आणि त्यामुळेच अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या, फुल टाईमपास करणाऱ्या ‘अमर, अकबर, अँथनी’ला लेखक बिनधास्तपणे अतर्क्य आणि आचरट म्हणतो. ज्यांनी तो चित्रपट पाहिलाय ते तमाम प्रेक्षक लेखकाशी ताबडतोब सहमत होतात. कारण इतका ठार आचरट आणि तरीही मनसोक्त करमणूक करणारा चित्रपट, खुद्द मनमोहन देसाईसुद्धा पुन्हा काढू शकला नाही.

एकंदरीत, चटपटीत फरसाण मसाला मिक्स जसे आपण गमतीने फस्त करतो, तसाच प्रस्तुत ‘सिनेमा मसाला मिक्स’ लेखसंठाह चटपटीत, चुरचुरीत आणि हिंदी चित्रपटाच्या १९७० ते २००० या प्रवासाची नोंद घेणारा.  नवचैतन्य प्रकाशनाची निर्मिती, सतीश भावसारांचे मुखपृष्ठ आणि अन्य तांत्रिक अंगेही सुबक.

सिनेमा मसाला मिक्स लेखक : दिलीप ठाकूर प्रकाशक : नवचैतन्य पृष्ठे – १२८ मूल्य : १४५ रुपये.