मालवणात वीजप्रश्नी नागरिक संतप्त

1

सामना ऑनलाईन । मालवण

मालवणात वीज समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी, जास्त दाबाने वीज पुरवठ्याने वीज उपकरणांचे नुकसान होत आहे. दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शेकडो नागरिकांसमवेत उपोषणास बसण्याचा इशारा देऊळवाडा सातेरीमांडवासियांनी वीज वितरणला दिला.

पहिल्याच पावसापासून आतापर्यंत वीज वितरणचे तीन तेरा वाजले आहेत. कार्यालयात फोन केला तर फोनला उत्तर दिले जात नाही. त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. विजेचे लपंडाव सुरूच आहेत. त्यामुळे शुक्रवारी देऊळवाडा सातेरी मांड येथील संतप्त नागरिकांनी वीज वितरणला धडक दिली.

राजन भोजणे यांच्या नेतृत्वाखाली नाना गांवकर, चंद्रकांत जैतापकर, योगेंद्र गावकर, समीर फाटक, संजय गावकर, संतोष फाटक, आदित्य चव्हाण, निखिल करलकर यांनी अधिकाऱ्याना धारेवर धरले. शहरात गेले काही दिवस कमी, जास्त दाबाने वीजपुरवठा होत आहे. तर दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. सातेरमांड परिसरातही वीज उपकरणांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन दिवसात हा कारभार न सुधारल्यास शेकडो नागरिकांसमवेत वीज वितरण समोर उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला.