भूपेन हजारिका यांचे कुटुंबीय ‘भारतरत्न’ स्वीकारणार नाहीत

61

सामना ऑनलाईन,कोलकाता

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ दिवंगत शास्त्रीय गायक भूपेन हजारिका यांना जाहीर झालेला ‘भारतरत्न’ पुरस्कार न स्वीकारण्याचा इशारा त्यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे. मूळचे आसामचे असलेले हजारिका यांना यंदाच्या प्रजासत्ताकदिनीच या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

भूपेन हजारिका यांच्या कुटुंबीयांनी ‘भारतरत्न’ परत करण्याचा इशारा दिला असला तरी त्याबाबत कुटुंबातील सदस्यांमध्येच मतभेद आहेत. हजारिका यांचे पुत्र तेज हजारिका हे अमेरिकेत असतात. त्यांनी नागरिकत्व विधेयकाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हजारिका यांचे बंधू समर यांनी मात्र पुरस्कार परत करण्याचा निर्णय कुटुंबातील एक सदस्य घेऊ शकत नाही असे सांगितले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ अलीकडेच मणिपुरी चित्रपट दिग्दर्शक अरीबम श्याम शर्मा यांनी त्यांना 2006 मध्ये मिळालेला ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. विशेषकरून ईशान्य हिंदुस्थानातील मेघालय, मणिपूर आणि आसाममध्ये या विधेयकाला तीव्र विरोध होत आहे. आसाममध्ये या मुद्दय़ावरून तेथील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही काळे झेंडे दाखवले होते. हे विधेयक घुसखोरांना कायदेशीरपणे हिंदुस्थानात घुसण्याची परवानगी देणारे आहे असा त्यांचा आरोप आहे.

आपली प्रतिक्रिया द्या