राहुल गांधींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी; निवडणूक अधिकाऱ्यासमोर 22 एप्रिलला सुनावणी

2

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नागरिकत्व आणि पदवीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत अपक्ष उमेदवार ध्रुव लाल कौशल यांनी राहुल यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांचे वकील अफजल वारिस, सुरेंद्र चंद्र आणि सुरेश कुमार यांनी राहुल यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतल्याने जिल्हा निवडणूक कार्यालयात शनिवारी सुनावणी झाली. पुढील सुनावणी 22 एप्रिलला ठेवण्यात आली आहे. राहुल गांधी यांचे वकील राहुल कौशिक यांनी अधिकाऱ्यांकडे वेळ मागितला आहे. ते 22 एप्रिलला राहुल गांधी यांची बाजू मांडणार आहेत.

अमेठी मदतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल कौशल यांच्या वकिलांनी राहुल गांधी यांचे नाव राऊल विंची असून त्यांच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अयोग्य दस्तावेज दिल्याचा दावा कौशल यांच्या वकिलांनी केला आहे. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राहुल यांनी ब्रिटनमधील कंपनीचा उल्लेख केलेला नाही. राहुल यांच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व असून त्यांच्या पदवीबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल यांनी प्रतिज्ञापत्रात ज्या महाविद्यालयातून शिक्षण घेतल्याचे सांगितले आहे, त्या महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलेले नाही, असा दावाही वकिलांनी केला आहे. वकिलांनी केलेल्या आरोपांचे आणि दाव्यांचे सर्व पुरावेही निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राहुल यांच्या उमेदवारीबाबत आक्षेप घेण्यात आल्यानंतर शनिवारी 11 वाजता सुनावणी घेण्यात आली. राहुल यांच्या वकिलांनी वेळ मागितल्यानंतर सुनावणी 22 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या घाडमोडींमुळे अमेठीत राजकीय नाट्य रंगण्याची शक्यता आहे.

अमेठीतील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्या उमेदवारीबाबतही आक्षेप घेण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार रोहित कुमार यांचे वकील उदय चंदानी यांनी इराणी यांच्या पदवीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला आहे. 2004 मध्ये चांदनी चौक मदतारसंघातून लढताना इराणी यांनी प्रतिज्ञापत्रात वेगळ्या पदवीचा उल्लेख केला होता. 2014 आणि 2019 मध्ये वेगळी पदवी कशी दाखवण्यात आली असा सवाल त्यांनी केला आहे.