हायकोर्टाच्या एडीआर आणि पाळणाघराचे सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन

सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि अब्राहम लिंकन हे पेशाने वकील होते. या महान नेत्यांनी सामंजस्यावर विश्वास दाखवून नागरिकांनी आपापसातील भांडणे सामोपचाराने सोडवावीत असा संदेश दिला. त्यामुळे समझोत्यावर प्रत्येकानेच भरोसा ठेवला पाहिजे असे सांगत सामंजस्याच्या संकल्पना वेगवेगळ्या असल्या तरी सर्वसामान्यांना न्याय मिळणे गरजेचे असल्याचे मत हिंदुस्थानचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आज व्यक्त केले.

सीटीओ इमारतीतील अल्टरनेट डिस्पुट रिझॉल्युशन सेंटर (एडीआर) आणि महिला कर्मचाऱयांच्या बालकांसाठी पाळणाघराचे उद्घाटन शनिवारी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या हस्ते झाले. पर्यायी न्यायव्यवस्था केंद्रामुळे प्रकरणे जलदगतीने मार्गी लागणार असून नागरिकांसाठी ते सोयिस्कर ठरणार आहे. परंतु ही प्रक्रिया जलदच नव्हे तर प्रभावी आणि कमी खर्चिक असावी. या केंद्रामुळे उच्च न्यायालयावरील भार कमी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर उपस्थित होत्या.

मुंबई उच्च न्यायालयासाठी नवीन वास्तू – मुख्यमंत्री
मुंबई उच्च न्यायालयाचा वाढता पसारा पाहता ही जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाला लवकरच नवी इमारत मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समारंभाप्रसंगी केली. नवीन हायकोर्टाची इमारत बीकेसी येथे होणार असून दोन वर्षांपूर्वी बार असोसिएशनने यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.