चांद्रसेनीय कायस्थ

मीना आंबेरकर

सीकेपी खाद्यशैली… अस्सल खवय्यांची आवडती. सोडे, अस्सल मटण, वालाचं बिरडं… काय आणि किती नावं घ्यावीत…

गेल्या वेळेला जातिमिष्ठ मसाल्यांविषयी आपण पाहिले. प्रत्येक जातीधर्माला स्वतःचे असे वेगळेपण दाखवायचे असते. त्यात गैर काहीच नाही. कारण हा मनुष्य स्वभावाचा भाग आहे. त्यानुसार त्यांच्या खाद्य-संस्कृतीतील वेगळेपण दिसून येते. हे वेगळेपण किंवा वैशिष्टय़ इतरांना जाणवावे हा त्यातील एक भाग असतो. गेल्या वेळेस आपण एक असाच जातीनिष्ठ मसाला पाहिला होता. याही वेळेस आपण असाच एक जातीचे लेबल लावलेला आणखी एक जातीनिष्ठ मसाला पाहणार आहोत. तो म्हणजे सी.के.पी. मसाला. तर बघूया या सी.के.पी मसाल्यातील घटक पदार्थ आणि त्यांचे प्रमाण.

सी.के.पी. मसाला…देशी लाल मिरची १ किलो, धणे पाव किलो, जिरे ५० ग्रॅम, बडिशेप ५० ग्रॅम.

कृती…वरील सर्व पदार्थ उन्हात वाळवून मिक्सरवर दळून, चाळून बरणीत भरून ठेवावे. हा रोजच्या वापरातला मसाला आहे. यात गरम मसाल्याचे कोणतेही घटक पदार्थ नाहीत. यासाठी जेव्हा गरम मसाला वापरायचा असेल तर त्यासाठी एक वेगळा तळलेला मसाला वापरला जातो. त्याचे साहित्य व कृती पुढीलप्रमाणे ः –

साहित्य…१ कांदा मोठा उभा चिरून, सुकं खोबरं १ वाटी, किसलेलं लसूण ४-५ पाकळय़ा, धणे २ चमचे, लवंग २-३ दालचिनी १ इंच, तमालपत्र १ तेल १ मोठा चमचा खसखस अर्धा चमचा.

कृती…प्रथम एका कढईत तेल टाकून त्यावर कांदा गुलाबी रंगावर परतावा. नंतर त्यावर लसूण, धणे, लवंग, दालचिनी, खसखस, तमालपत्र टाकून परतावे. हे मिश्रण वेगळे काढून घ्यावे नंतर कढईत सुकं खोबरं घालून गुलाबी होईपर्यंत परतावे. नंतर सर्व मिश्रण बारीक वाटून घ्यावे. वापरून झाल्यावर उरलेला मसाला फ्रिझरमध्ये ठेवावा. आता पाहूया हा मसाला वापरून तयार केलेल्या काही खाद्यकृती.

vadi-1

रुमाली वडय़ा

आत भरण्याचे सारण… १ वाटी सुकं खोबरं किसून तव्यावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावे त्यानंतर हाताने चांगले चुरून घ्यावे, ५० ग्रॅम खसखस भाजून कुटून घ्यावी. १-२  हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात. मीठ, थोडा तळलेला मसाला व १ चमचा सुका सीकेपी मसाला व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे मिश्रण तयार करावे.

कव्हरसाठी…बेसन २ वाटय़ा, कणिक २ टी स्पून, मीठ चवीनुसार, आलं अर्धा इंच, हळद १ टी स्पून, लसूण ४ पाकळय़ा, हिरव्या मिरच्या २-३  टी स्पून सीकेपी मसाला  २-३ चमचे.

कृती…प्रथम पिठात सर्व जिन्नस घालून वाटीस दीड वाटी पाणी घालून गुठळी होऊ न देता मिश्रण मंद गॅसवर सतत ढवळा. घट्ट झाल्यावर वरून १ टे. स्पून तेल घालून झाकण ठेवून मंद आचेवर वाफ आणावी. पोळपाटावर स्वच्छ ओले फडके घेऊन त्याला तेलाचा हात लावावा व त्यावर हे पीठ चौकोनी आकारावर थापावे. त्यावर वर तयार केलेले सारण दाबून पसरावे व त्याची त्रिकोणी आकाराची वळकटी करावी. वडय़ा कापून तेलात तळाव्या. सारणात सुक्या खोबऱयाऐवजी ओला नारळही वापरता येतो. परंतु तोही तव्यावर भाजून घ्यावा. त्याचप्रमाणे कव्हरसाठी पिठ भिजवताना पाण्याऐवजी नारळाचे दूधही वापरता येते.

wandgi-sode

सोडे घालून वांग्याची भाजी

साहित्य…वांगी ८-१० छोटी, खसखस अर्धा चमचा, कांदे २-3 मध्यम, सोडे १ वाटी, आले लसूण पेस्ट १ चमचा, सीकेपी कोरडा मसाला २ चमचे, तळलेला मसाला २ चमचे, गूळ चवीनुसार, मोहरी अर्धा टी स्पून, हिंग चिमूटभर, आलं अर्धा इंच, लसूण ३-४ पाकळय़ा, तेल ३ टे. स्पून.

कृती…सोडे बारीक तुकडे करून ते धुवून घ्यावेत. सोडय़ाला आलं-लसूण पेस्ट लावावी. त्यावर अर्धा टी स्पून हळद, चवीनुसार मीठ नीट लावून ठेवावे. थोडय़ा तेलावर सोडे परतून शिजवून घ्यावेत. वांग्यांना चिरा देऊन ती पाण्यात घालून ठेवावीत. एका भांडय़ात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तळलेला मसाला, सुका मसाला परतलेले सोडे, हळद, मीठ, गूळ एकत्र कालवावे. हा मसाला चिरलेल्या वांग्यात घट्ट भरावा. एका पातेल्यात तेल घेऊन हिंग-मोहरीची फोडणी करावी. त्यावर अलगद भरलेली वांगी सोडावीत. उरलेला मसालाही त्यात घालावा. अगदी थोडे पाणी घालून मंद गॅसवर भाजी शिजू द्यावी.

khemma-khicdi

खिम्याची खिचडी

साहित्य…खिमा अर्धा किलो, वेलची १ किंवा २, १ नारळाचे दूध, कांदे ४ मोठे, हळद १ टी स्पून, हिरव्या मिरच्या २, दालचिनी १ तुकडा, तांदूळ दीड वाटी, शहाजिरे अर्धा चमचा, सीकेपी मसाला ३ टी स्पून, तळलेला मसाला ३ चमचे, लवंग २-३, तूप ३ टेबल स्पून, काजू तुकडे आवडीप्रमाणे, मीठ चवीनुसार.

कृती…प्रथम खिमा स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढून टाकावे. त्यानंतर तळलेल्या मसाल्याचे वाटण लावून खिमा मुरवत ठेवावा. २ कांदे बारीक व २ कांदे जाड चिरून घ्यावेत. एका नारळाचे दूध काढून घ्यावे. २ टे. स्पून तुपावर बारीक चिरलेला कांदा टाकून लालसर झाल्यावर त्यात खिमा घालून परतून घ्यावा व चांगला सुका शिजवावा. पाणी घालू नये. उरलेल्या तुपावर अख्खा गरम मसाला व वेलची घालून फोडणी करावी. त्यात जाड चिरलेला कांदा टाकून व खिमा टाकावा. त्यावर सीकेपी कोरडा मसाला व चवीनुसार मीठ घालून चांगले परतून घ्यावे. नारळाचे दूध, काजू व थोडे पाणी घालून चांगली वाफ आणावी. भात शिजल्यावर वरून कोथिंबीर घालावी.