आमदार केंद्रे यांच्या विरोधात ५० कोटींचा दावा – उद्योगपती रत्नाकर गुट्टे

सामना प्रतिनिधी । परभणी

गंगाखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे धादांत खोटे असून आमदार केंद्रे यांच्या विरोधात लवकरच आपण ५० कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा ठोकणार असल्याचे स्पष्ट मत उद्योगपती डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्यामुळे डॉ. रत्नाकर गुट्टे यांना आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी केलेल्या आरोपांचे खंडण करता आले नव्हते. त्यामुळे हिंदुस्थानात परतताच डॉ. गुट्टे यांनी ताबडतोब पत्रकार परीषद घेतली. आपली गंगाखेड शुगर्स अ‍ॅण्ड एनर्जी लि. ही एकमेव संस्था असून सुनील हायटेक ही संस्था मोठ्या मुलाची तर व्ही. जी. आर. डिजिटल ही लहान मुलाची संस्था आहे. या संस्थेशी आपला संचालक म्हणून देखील संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार डॉ. केंद्रे यांनी गंगाखेड शुगर्स एनर्जीवर १ हजार ४६६.४४ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा आरोप केला आहे. या आरोपात तथ्य नसून केवळ १८५.४४ कोटी रुपयांचे कर्ज आहे. तसेच सीसी मर्यादाही १३४.२७ तर बँक गॅरंटी ४१.७६ कोटी असे एकूण ३६१.४७ कोटी एवढेच आहे. सुनील हायटेक इजिं. लिमिटेडवर देखील २ हजार ४१३.३२ कोटी कर्ज असल्याचा आरोप केला आहे. यावर केवळ १२२.१० कोटीचेच कर्ज आहे. सीसी मर्यादा ४२५.७१ कोटी आणि बँक गॅरंटी १ हजार ५०३.४ असे एकूण २ हजार ५०.८५ कोटी रुपये कर्ज आहे. तसेच सीम इंडस्ट्रीज लि.वर ८६.६५ कोटी कर्ज असल्याचा आरोप केंद्रे यांनी केला होता. प्रत्यक्षात १.६५ कोटीचेच कर्ज आहे. व्ही.आर.जी. डिजिटल यावर ३१.०६ कर्ज असल्याचा आरोप फेटाळत गुट्टे यांनी केवळ १.६० कोटी रुपये कर्ज असल्याचे सांगीतले आहे. कर्जाची आकडेवारी खोटी सांगून केंद्रे यांनी दिशाभूल केली आहे. त्यामुळे लवकच आपण त्यांना एक नोटीस पाठविणार असून ५० कोटी नुकसान भरपाईचा दावा दाखल करणार असल्याचा पुनर्रुच्चार त्यांनी यावेळी केला.

आगामी निवडणुकीत डॉ. मधुसूदन केंद्रे यांची अनामत रक्कम देखील शिल्लक राहणार नाही, अशी खिल्ली उडवत विधानसभा निवडणुक रिंगणात यावेळी आपण स्वत: उतरणार असून आपला विजय निश्चितच होणार असल्याचे सांगीतले. गंगाखेडचे आमदार डॉ. केंद्रे यांच्या सोबत जोडीला दोन कार्यकर्ते देखील नसतात. असे सांगत कोणतेही काम टक्केवारी घेतल्या शिवाय केले जात नाही. त्यामुळेच गंगाखेडच्या रेल्वेपुलाचे काम वारंवार रखडल्या जात असल्याचे यावेळी बोलून दाखविले. तसेच आमदार विकास निधीतून डॉ. केंद्रे यांनी कोणतेही काम केलेले नसून कोणीही आपणास हे काम दाखवावे. प्रत्येक कामागणीक एक हजार बक्षीस देण्याचे आश्वासन यावेळी गुट्टे यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून परस्पर रक्कम उचलली, या आरोपाचे उत्तर मात्र देण्यास गुट्टे यांनी टाळाटाळ केली असल्याचे जाणवू लागले. आमदार केंद्रे यांना आपण निश्चित शह देण्यास कधीच, कोणत्याही बाबातीत कमी पडणार नसल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखविले.

आपली प्रतिक्रिया द्या