संभाजीनगरात कचरा पेटला

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगरातील कचरा प्रश्न बुधवारी अक्षरश: पेटला. मिटमिटा आणि पडेगावमध्ये कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या गाडय़ांवर स्थानिकांनी तुफान दगडफेक करत दोन गाड्य़ा पेटवून दिल्या. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्य़ांवरही दगडफेक झाली. संतप्त जमावाने अनेक खासगी वाहनांची तोडफोड केली. आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधूरही सोडला, परंतु त्यानंतरही आंदोलक आवरत नसल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार करून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दगडफेकीत उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह नऊ पोलीस गंभीर जखमी झाले. १०० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

४० वर्षांपासून नारेगाव येथे असलेला कचरा डेपो हटवा या मागणीसाठी नारेगाववासीयांनी आंदोलन केल्यापासून गेल्या १९ दिवसांपासून शहरातील कचरा शहराबाहेर टाकण्यात आलेला नाही. कचरा आपल्या भागात येऊ नये म्हणून अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने नारेगावात कचरा टाकण्यास प्रतिबंध केल्यानंतर आज महापालिकेने मिटमिटा येथील सफारी पार्कच्या जागेवर कचरा टाकण्याची तयारी केली.

संभाजीनगर महापालिकेचे कार्यकारी अभियंता सय्यद सिकंदर अली हे बुधवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह मिटमिटा येथील प्रस्तावित कचरा डेपोच्या जागेवर पाहणी करण्यासाठी गेले होते. ते पाहताच मिटमिट्य़ातील गावकऱ्यांनी परतीच्या मार्गावर दगड लावून त्यांचे रस्ते बंद करून टाकले. पालिका अधिकाऱ्यांनी त्यावर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी रस्त्यावरचे दगड हटवून पालिका अधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्तात शहरात आणले. गावकऱ्यांचा विरोध लक्षात आल्यानंतरही कचऱ्याचे ट्रक पोलीस बंदोबस्तात पडेगाव, मिटमिट्य़ाच्या दिशेने निघाले तेव्हा तेथील नागरिकांचा जमाव हिंसक बनला.

नगर नाक्यावरून वाहने वळवली

हिंसक जमावाने केलेल्या तोडफोडीत सुमारे १०० दुचाकींचे आणि पाच ते सहा खासगी चारचाकी गाड्य़ांचे नुकसान झाले आहे. परिस्थिती तणाकपूर्ण असून पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर मिटमिट्य़ाकडे जाणारी काहने पोलिसांनी नगर नाक्यावरच रोखून नंतर अन्य मार्गाने कळकिण्यात आली.
शालेय विद्यार्थी अडकले

पडेगाव-मिटमिट्य़ातील आंदोलनामुळे शाळेच्या अनेक बसेस जवळपास चार ते पाच तास अडकून पडल्या होत्या. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी रस्त्यावरचा विरोध मोडून काढल्यानंतर आता घराघरात शिरून आंदोलकांना पकडून आणणे सुरू केले आहे. सायंकाळपर्यंत १०० पेक्षा अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते.