पश्चिम बंगालमध्ये राडा, पोलिसांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज; अश्रूधुराचा वापर

51

सामना ऑनलाईन । कोलकाता

लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचार दिवसेंदिवस वाढत असून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांचे सत्र सुरू आहे. मालदा येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आशीष सिंह या भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेश मोडत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. जमाव अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी लाठीमार, अश्रूधुराचा आणि पाण्याच्या फवाऱयाचा वापर करत आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. वातावरण अधिकच चिघळल्याने बंगालमध्ये कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्की आशीष अचानक मालदा येथून बेपत्ता झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. पण बुधवारी त्यांचा मृतदेह इंग्लिश बाजार पोलीस ठाणे हद्दीतील बाधापुकूर येथे सापडला. मृतदेहावर जखमांचे व्रण असल्याने आशीष यांची हत्या झाली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावरून संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत पोलीस ठाण्यालाच घेराव घातला.

पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांत संघर्ष
पोलीस मुख्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱया जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने कार्यकर्ते अधिकच चवताळले. आक्रमक झालेल्या जमाकाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा आणि पाण्याचा वापर केला, मात्र तरीही कार्यकर्ते मागे हटत नसल्याने पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात तीव्र संघर्ष झाला. पोलिसांनी सुरक्षेसाठी लावलेल्या बॅरिकेडस्ही भाजप कार्यकर्त्यांनी उखडत ‘जय श्रीराम’ अशी तुफान घोषणाबाजाही केली.

आपली प्रतिक्रिया द्या