ठसा : डॉ. सुहासिनी कोरटकर

शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात भेंडीबाजार घराण्याचा वारसा समर्थपणे पुढे चालविणाऱ्या नावांमध्ये एक नाव डॉ. सुहासिनी कोरटकर हेदेखील होते. उस्ताद अमन अली खाँ, पं. त्र्यंबकराव जानोरीकर या मान्यवरांनी भेंडीबाजार घराण्याच्या गायकीला एक स्थान मिळवून दिले. तोच वारसा डॉ. सुहासिनी कोरटकर यांनी पुढे नेला. ३० नोव्हेंबर १९४४ रोजी जन्मलेल्या सुहासिनी यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण खरे म्हणजे अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय घेऊन झाले. मात्र पुढे त्यांनी पीएच.डी. केली ती मात्र संगीत विषयात. लहानपणापासूनच त्यांना असेही संगीताचे धडे मिळाले होतेच. त्यात ज्येष्ठ संगीततज्ञ पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडून त्यांना भेंडीबाजार घराण्याच्या गायकीची तालीम मिळाली. ज्येष्ठ ठुमरी गायिका नैना देवी यादेखील त्यांच्या संगीत गुरू होत्या. गुरूंचे मार्गदर्शन आणि संगीत साधना या जोरावर त्यांनी पुढे त्यांचे स्वतःचे स्थान निर्माण केले. बंदिशींचे सुरेख सादरीकरण, लयीत गुंफलेली सरगम आणि ताना हे सुहासिनीताईंच्या गायकीचे वैशिष्टय़ होते. शास्त्रीय संगीताशिवाय ठुमरी, दादरा, नाट्यसंगीत, अभंग आदी प्रकारदेखील त्यांनी हाताळले. मात्र सुहासिनीताईंचे खरे योगदान राहिले ते भेंडीबाजार घराण्याचा वारसा समर्थपणे पुढे नेण्यात तसेच त्या घराण्याची ओळख संगीत क्षेत्रात पुन्हा दृढ करण्यात. त्याशिवाय त्यांचा सर्वात मोठा गुण होता तो स्वतःची कारकीर्द घडविण्याबरोबरच मुक्तहस्ते विद्यादान करण्याचा. त्यामुळे त्यांच्या हातून अनेक शिष्य घडले. आपले गुरू पं. जानोरीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सुरू केला होता. ‘निगुनी’ या टोपणनावाने त्यांनी केलेली उत्तमोत्तम बंदिशींची रचना हे तर त्यांचे कार्य खरोखर अलौकिक होते आणि संगीत इतिहासात त्याची कायमची नोंद राहील. संगीत साधनेबरोबरच संगीत प्रसार आणि प्रचार यासाठीच त्यांनी आयुष्यभर कार्य केले. आकाशवाणीच्या अ. भा. गंधर्व महाविद्यालयाची ‘संगीताचार्य’ या सर्वोच्च पदवीने त्यांना गौरविण्यात आले होते. त्याशिवाय सूर-सिंगार संसद या संस्थेचा सुरमणी पुरस्कार, गानवर्धन, पुणेतर्फे स्वर-लय भूषण पुरस्कार, संगीत शिरोमणी पुरस्कार, संगीत मर्मज्ञ पुरस्कार अशा अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविले गेले. देशभरातील अनेक प्रतिष्ठेच्या संगीत मैफलींमध्ये त्यांचा नेहमी सहभाग राहिला. हिंदी आणि मराठी अभंग तसेच भावगीते, गझला त्यांनी संगीतबद्ध केल्या. दिल्ली आकाशवाणी केंद्राच्या ‘केंद्र संचालिका’ तसेच ‘कार्यक्रम संचालिका’ (संगीत) या पदांवरही त्यांनी काम केले. शेवटपर्यंत त्यांची संगीत साधना आणि गायन प्रसाराचे कार्य सुरूच होते. भेंडीबाजार घराण्याच्या गायकीबाबतचे पहिले श्रेय त्या आपल्या वडिलांना देत. वडिलांनी जर योग्यवेळी आपला संगीत शिक्षक बदलला नसता तर कदाचित या घराण्याच्या सुंदर गायकीला आपण कायमचे मुकलो असतो, असे त्या म्हणत. त्यांच्या आई सरलाताई यादेखील शास्त्रीय गायिका होत्या आणि सुहासिनीताईंच्या संगीत शिक्षणाबाबत अत्यंत काटेकोर आणि शिस्तप्रिय असत. त्यामुळेच भेंडीबाजार घराण्याच्या गायकीची आपल्याला गोडी लागली, त्याची उत्कृष्ट तालीम आपण करू शकलो असे सुहासिनीताई म्हणत. त्यांच्या निधनाने भेंडीबाजार घराण्याचा एक दुवा निखळला आहे.