स्वच्छतेचा कानमंत्र

 • परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी घरातील कचरा बाहेर टाकताना थोडीशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
 • सॅनिटरी नॅपकीन्स, लहान मुले व आजारी माणसासाठी वापरण्यात येणारे हगीज यांची योग्य विल्हेवाट लावावी. या वस्तू रद्दी कागदात गुंडाळून त्यावर एक लाल रंगाचा ठिपका काढावा. जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या व्यक्तीला ते पाकीट उघडायचे नाही हे लक्षात येईल.
 • फुटलेल्या काचेच्या वस्तू, गंजलेल्या वस्तू फेकताना विशेष खबरदारी घ्यावी. कचऱ्याची विल्हेवाट लावणारीसुद्धा माणसेच आहेत. या वस्तूंच्या संपर्कात येणाऱ्या प्राणी आणि व्यक्तींना इजा पोहोचू शकते.
 • कधी कधी घरी खूप पाहुणे जेवून जातात. त्यानंतर उरलेल्या अन्नाचीही योग्य खबरदारी घ्यावी. घराजवळील रस्त्यावरील कुत्री एकढे अन्न खाऊ शकत नाहीत. असे अन्न जवळील कचरापेटीत टाकले की, दुसऱ्या दिवशी त्याचा दुर्गंध सर्वत्र पसरू शकतो.
 • कोणी उघड्यावर कचरा फेकत असेल, तर त्यांना तसे न करण्याविषयी सुचवा. कदाचित ते तुमचे ऐकणार नाहीत. पण तुम्ही त्यांना विरोध करू शकलात. याचे तुम्हाला समाधान मिळेल.
 • मासेप्रेमींनी माशांचा कचरा रस्त्यावर फेकण्यासाठी कचरा गाडीची वाट पहावी. कचरा साफ करणाऱ्यांचा आदर करा.
  कुत्राप्रेमींनी आपल्या कुत्र्यांना टायलेट ट्रेनिंग द्यावे. रस्ते म्हणजे त्यांचं सार्वजनिक शौचालय नव्हे. हे लक्षात ठेवावे.
 • आपल्या घरातला गळका माठ, झोपायच्या गाद्या या वस्तू भर रस्त्यावर फेकू नका. कधीतरी त्या माठातलं थंडगार पाणी प्यायला होता. हे विसरू नका.
 • बाजारात जाताना तुमची स्वतःची पिशवी जवळ बाळगावी. प्लॅस्टिकचा वापर टाळावा.
 • बागकामाची आवड असेल तर ओल्या-सुक्या कचऱ्याची खतनिर्मिती करू शकता.
 • नको असलेल्या घरातील वस्तू, रद्दी, प्लॅस्टिकच्या वस्तू, चपला घरात साठवून न ठेवता भंगारवाल्याला देऊन टाका.