सावधान! अंटार्क्टिकाचा रंग होतोय हिरवा

सामना ऑनलाईन । लंडन

जयवायू परिवर्तन आणि वाढत्या ग्लोबल वॉर्मिगचे धोके आता स्पष्ट दिसत आहे. जगातील सर्वाधिक बर्फ असणाऱ्या अंटार्क्टिका खंडावर याचे भयावह परिणाम दिसून येत आहेत. वाढत्या तापमानामुळे अंटार्क्टिकाचा नकाशाच बदलून गेला आहे. एकेकाळी वर्षाच्या बाराही महिने बर्फाच्या चादरीखाली झाकून असणाऱ्या अंटार्क्टिकावरील खडकांवर आता बर्फाऐवजी हिरवळ दिसून येत आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांना अंटार्क्टिका खंड येणाऱ्या काळात नामशेष होण्याची भीती वाटत आहे.

१९५० पासून अंटार्क्टिका खंडावरील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मागील ६७ वर्षांमध्ये अंटार्क्टिका खंडावरील तापमानात प्रत्येक १० दशकाला ०.५० अंश सेल्सिअसची वाढ होताना दिसून आले आहे. जगभरात ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणाऱ्या तापमान वाढीपेक्षा अंटार्क्टिका खंडावरील तापमानात वेगाने वाढ होत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. १९५० हे वर्ष जागतिक वातावरणात बदल होणारे वर्ष मानले जाते.

केंब्रिज विद्यापिठ आणि अंटार्क्टिकावर सर्वे करणाऱ्या ब्रिटिशमधील शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिका खंडावरील मागील १५० वर्षामधील बदलत्या वातावरणाचा अभ्यास केला असता त्यांना असे दिसून आले की, अंटार्क्टिकावर उगवणाऱ्या शेवाळात गेल्या ६०-७० वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. बदलते वातावरण, प्लास्टिकचा अतिवापर, हवा प्रदुषण आणि आण्विक उर्जा यामुळे यात वाढ होत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

याबाबत बोलताना डॉक्टर मॅट एम्सब्रे यांनी सांगितले की, १९५० नंतर अंटार्क्टिका खंडावर उगवणाऱ्या शेवाळाच्या वेगात ४-५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेवाळामुळे तापमानात वाढ होण्यास मदत होत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात अंटार्क्टिका खंडावरील बर्फ नामशेष होण्याचा धोका आहे. मात्र हा कालावधी खुप मोठा असल्याचे एम्सब्रे यांनी सांगितले.