मुंबईत परतीच्या पावसाचा धुमाकूळ

सामना ऑनलाईन, मुंबई

ऑक्टोबर हीटने प्रचंड हैराण झालेल्या मुंबईकरांना शुक्रवारी दुपारी ४ वाजता विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगड़ाटासह आलेल्या पावसाने सुखद गारवा दिला आणि हवामान विभागाचा अंदाज पुन्हा एकदा  खरा ठरला. भर दुपारी अचानक काळोख झाला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. परंतु,कामावरून घरी जाण्याच्या वेळेत पावसाने हजेरी लावल्याने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. इतके दिवस कडक उन आणि उकाडय़ाची सवय झाल्याने छत्री विसरलेल्या चाकरमान्यांना भिजतच घर गाठावे लागले. तर अनेकांची आडोशासाठी शोधाशोध सुरू झाली.

कुलाब्यापासून पुढे दादर, कुर्ला, भांडूप, मुलूंड, ठाणे, डोंबिवली, कर्जत, कसारा, नवी मुंबई तर पश्चिम उपनगरांमध्ये अंधेरी, बोरीवली, दहीसर ते पुढे वीरार, वसई आणि पालघरपर्यंत  सर्वत्रच पावसाने १५ ते २० मिनीटे अक्षरश: धुमाकूळ घातला. बंगालच्या खाडीत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा कोल्हापूरमार्गे पुढे सरकत रत्नागिरी आणि मुंबईपर्यंत आल्याने मुंबईत पावसाला सुरुवात झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढते तीन दिवस मुंर्बसह राज्यभरात पाऊस पडेल मात्र अतिवृष्टी होणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

काळोख झाला अन् काळजात धस्स झालं

भर दुपारी सगळीकडे संध्याकाळचे पावणेआठ वाजल्यासारखा काळोख पडला. त्यामुळे चाकरमान्यांच्या काळजात थोडय़ा वेळासाठी धस्स झालं. २९ ऑगस्टसारखा पाऊस पडतो की काय अशी शंकेची पाल मनात चमकून गेली.