मनमोहन सिंगांच्या काळात अर्थव्यवस्थेची बदनामी – मुख्यमंत्री

सामना ऑनलाईन । नागपूर

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे विद्वान अर्थशास्त्रज्ञ होते तरीही भारतीय अर्थव्यवस्थेची सर्वात जास्त बदनामी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या १० वर्षाच्या काळात झाली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली. नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभर पाळण्यात येत असलेल्या काळा पैसा विरोधी दिवसानिमित्त स्थानिक रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी आज यावेळी या काळातील आकडेवारी सादर करीत नोटाबंदीचा निर्णय कसा योग्य होता हे स्पष्ट केले. देशात मोदींची सत्ता आल्यावर देशाची अर्थव्यवस्था मार्गी लावण्यासाठी निर्णयांची श्रृंखला घेतली आणि त्यानुसार कारवाई केली. परदेशात असलेल्या भारतीयांच्या मालमत्ता गोठविण्यासाठी कायदे केले आणि विविध देशांशी या संदर्भात करारही केले. या श्रृंखलाबद्ध संघर्षातील महत्वपूर्ण टप्पा हा नोटाबंदीचा निर्णय होता असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.