देशाला नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही – मुख्यमंत्री


राजेश देशमाने । बुलढाणा

नरेंद्र मोदींसारख्या कणखर नेतृत्वाशिवाय देशाला पर्याय नाही. त्यामुळे मतदारांनी कावेबाज आघाडीला मत देऊन ते वाया घालविण्यापेक्षा सुरक्षित हिंदुस्थानाच्या उभारणीसाठी युतीच्या पाठीमागे उभे रहावे. कारण युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना मत म्हणजे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिखली येथे प्रचारसभेत केले.

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ सोमवारी चिखली येथे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीवर घणाघाती शब्दात प्रहार केला. मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसच्या पाच पीढ्यांनी गरिबी हटविण्याची घोषणा केली. आता राहुल गांधीही तीच घोषणा करत आहे. मात्र या देशातला गरीब तसा राहिला. राहुल गांधी जे बोलतात ते सर्व काल्पनिक असल्यासारखं आहे. त्यामुळे टिव्ही सिरियल्समध्ये सुरुवातीला ज्या प्रमाणे दाखवतात ही कथा काल्पनिक आहे. त्याप्रमाणेच राहुल गांधीच भाषण सुरु होण्याआधी तसच दाखवलं पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला.

‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात शेतकर्‍यांना 72 हजार देण्याची घोषणा केली आहे. मात्र हा पैसा कोठून देणार, हे त्यांना सांगता येत नाही. ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ झाल्यासारखे आमच्या सरकारच्या काळात जमा झालेला पैसा देण्याची भाषा काँग्रेस वाले करत असल्याचा आरोप यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

गेल्या पाच वर्षातील सरकारची उपलब्धता सांगातांना मुख्यमंत्री म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत 98 टक्के नागरिकांना शौचालये देण्यात आले. जनधन योजनेतून 80 हजार कोटींचा निधी थेट जनतेच्या खात्यात टाकण्यात आला. उज्वला योजनेतून 13 कोटी नागरिकांना गॅस जोडून देण्यात आले. आयुष्यमान भारत योजना, मुद्रा योजना, दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजना अशा अनेक जनकल्याणाच्या योजना सरकारने राबविल्या पुढे 60 वर्षापेक्षा अधिक वयोमान असलेल्या कामगार, शेतकरी, कष्टकरी नागरिकांसाठी पेंशन योजना आणून त्यांचे जीवनमान उंचाविण्याचे कार्य सरकार करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. देशाबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठीही सरकारने सर्वाधिक निधी दिला असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

आघाडीच्या काळात 256 कोटी मातृतिर्थ बुलढाण्यासाठी दिले होते मात्र युती सरकारने तब्बल 2 हजार 609 कोटी जिल्ह्याच्या विकासासाठी दिले. मॉ जिजाऊ विकास आराखडा, शेगाव विकास आराखड्याचे काम सुरु आहे. जिल्हा बँकेला 250 कोटी देऊन तिला जीवनदान देण्यात आले. केंद्रीय प्रकल्प आणि राज्य शासनाच्या निधीचा विचार केला तर 10 हजार कोटीच्या वर निधीची विकासकामे जिल्ह्यात सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, ही निवडणूक गल्लीची नसून दिल्लीची निवडणूक आहे. देश कुणाच्या हातात सुरक्षित आहे याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. आघाडी सरकारच्या काहात देशावर आंतकवादी हल्ला झाला तेव्हा या सरकारने नुसत्या चर्चा केल्या. मात्र मोदी सरकारने कणखर भूमिका घेवून शत्रु राष्ट्राला भारताची ताकद दाखवून दिली. उरी येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा सर्जिकल स्ट्राईक करुन त्याचा बदला घेण्यात आला. पुलवामा झाल्यानंतर भारताच्या वीर सैनिकांनी बालाकोट एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानला धडकी भरवली. परंतु आता काँग्रेस राष्ट्रवादीवाले पुन्हा पाकसोबत चर्चा करण्याची भाषा करत आहे. 124 अ हे देशद्रोहाचे कलम रद्द करुन काश्मीरमधील सैनिकांचे अधिकार करण्याचे आश्वासने आघाडीच्या जाहीरनाम्यातून देण्यात आली. त्यामुळे तुम्ही फक्त चर्चा करणार्‍यांना मतदान करणार का? असा रोखठोक सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विचारला. ही निवडणूक कुण्या एका उमेदवाराची नाही तर देशाच्या अस्मितेची आणि संविधान व तिरंगा मजबूत ठेवण्याची निवडणूक आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या हातात पुन्हा देशाची धुरा देण्यासाठी युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती, आमदार शशिकांत खेडेकर, जि.प. अध्यक्ष उमा तायडे, भाजप जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, श्वेता महाले, प्रिया बोंद्रे, आदींसह युतीच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. या जाहीरसभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.