सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीने पुण्याकडे पाहिले

पुणे, (प्रतिनिधी)

मलिदा कोणी खायचा? ‘पीएमआरडीए’चा अध्यक्ष मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री करायचा? या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील भांडणामुळेे गेली १०-१५ वर्षे पुण्याचा विकास होऊ शकला नाही. त्यांच्यासाठी ‘पुणे म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी’ अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच कार्यक्रम आणि तीन सभा घेऊन पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ केला.
सोमवार पेठेतील नागेश्‍वर मंदिराच्या जीर्णोद्धार, लोकार्पण सोहळ्यानंतर सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पुण्याला आजपर्यंत आंतरराष्ट्रीय स्वरूप यायला हवे होेते; परंतु गेल्या १०-१५ वर्षांत पुण्याचा विकास रखडला. ‘पीएमआरडीए’ करण्यासाठी १० वर्षे लागली. अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना करायचे की उपमुख्यमंत्र्यांना? या भांडणात काँग्रेस-राष्ट्रवादीने वाट लावली. मलिदा कोणाला मिळणार? यासाठीचे हे भांडण होते.

शहराच्या विकास आराखड्याला लवकरच मंजुरी दिली जाईल. मेट्रोचे भूमिपूजन २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. झोपडपट्टी विकास आणि ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प यांना गती दिली जाईल. २०१९पर्यंत प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका आहे.

महापालिकेत सत्ता द्या; पुण्यातील झोपड्या आणि गरिबांचा प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन फडणवीस यांनी दिले.
बापट म्हणाले, येत्या निवडणुकीत महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
सभेचे आयोजक नगरसेवक गणेश बीडकर यांनी स्वागत करताना, फडणवीस हे गल्लीबोळातही फिरून ताकद देणारे मुख्यमंत्री आहेत, असे सांगितले. यावेळी सभेला राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, प्रदीप रावत उपस्थित होते.

झेंड्याची काठी माझ्याकडे

भाजपचे गटनेते गणेश बीडकर म्हणाले, ‘आपण लहान असताना गिरीश बापट यांनी माझ्या हाती भाजपच्या झेंड्याची काठी दिली. ते माझे नेते आहेत.’ त्याचा संदर्भ घेत बापट म्हणाले, ‘मी तुमच्या हाती झेंडा दिला. काठी मात्र माझ्याच हातात आहे. ती कोणाला कधी मारायची, हे मी ठरवितो.’