मुख्यमंत्र्यांच्या सभांचा झंझावात

2

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झंझावाती सभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी विरोधी पक्षांचा चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रहितासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी मोदींनाच मते द्या. पुन्हा एकदा मजबूत सरकार निवडून आणा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. सर्व सभांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रवादीने इंजिन भाडय़ाने घेतलेय
पूर्वी सायकल, मोटार भाडय़ाने घेतली जात होती, आता राष्ट्रवादी काँग्रेसने इंजिन भाडय़ाने घेतले आहे. पण केवळ खोटे बोलून तोंडाच्या वाफेने इंजिन चालत नसते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. काळाचौकी येथे शहीद भगतसिंग मैदानावर महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी आयोजित विजयी संकल्प सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी शिवसेना आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, उपनेत्या मीना कांबळी, माजी आमदार दगडू सकपाळ, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर व पांडुरंग सकपाळ, भाजपचे नेते मधू चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार, प्रवक्त्या शायना एन. सी., आमदार मंगलप्रभात लोढा, अतुल शहा आदी उपस्थित होते.

ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची
यंदाची निवडणूक ही फक्त विकासाच्या मुद्दय़ाची नसून राष्ट्रीय अस्मितेची आहे. राष्ट्रीय सुरक्षा हादेखील निवडणुकीचा प्रमुख मुद्दा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कणखर सरकार बनण्यासाठी नरेंद्र मोदींनाच मते द्या, असे आवाहन मतदारांना केले. ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ घाटकोपरमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुनील राऊत, भाजप नेते-खासदार किरीट सोमय्या, महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

देशाच्या रक्षणासाठी मोदीच हवेत!
लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. देशाचा मान, सन्मान आणि सीमा सुरक्षित ठेवायच्या असतील तर महायुतीलाच मतदान करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीच खंबीरपणे देशाचे संरक्षण करू शकतील, असे ते म्हणाले. उत्तर-मध्य मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारासाठी कुर्ला-नेहरूनगर येथे विजयी संकल्प सभा झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी शिवसेना नेते ऍड. लीलाधर डाके, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत, रिपाइंचे नेते अविनाश महातेकर, शिवसेना विभागप्रमुख-संजय पोतनीस, आमदार मंगेश कुडाळकर, तृप्ती सावंत, पराग अळवणी, विधानसभा संघटक दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.