मुख्यमंत्र्यांनी २ गुन्हे लपवले – पटोले

सामना ऑनलाईन । नागपूर 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध २४ गुन्हे दाखल असताना त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात केवळ २२ गुन्ह्यांचा उल्लेख करून दिशाभूल केली आहे. त्यांनी वगळलेल्या दोन पैकी एक गुन्हा फसवणुकीचा (कलम ४२०) आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याबद्धल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी पटोले यांनी केलीय. हे प्रकरण नव्याने उपस्थित करणारे नागपुरातील वकील अॅड. अभियान बाराहाते यांना मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू संजय फडणवीस यांनी फोनवरून अश्लील भाषेत धमक्या दिल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.  या प्रकरणाची नागपुरात अजनी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पटोले यांनी केली. या तक्रारीच्या समर्थनात पटोले यांनी कथित संजय फडणवीस यांच्या ऑडियो संभाषणाची टेपही ऐकविली.

फडणवीस यांनी दोन गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नसल्याचे प्रकरण यापुर्वी नागपुरातील अॅड. सतीश उके यांनी उपस्थित केले होते.  न्यायालयाने हे प्रकरण  फेटाळले होते. मात्र, अॅड. उके यांचे वकीलपत्र घेणारे अॅड. बाराहाते यांनी नव्याने हे प्रकरण उपस्थित केल्यावर त्यांना जिवे मारण्याची धमकी आली. त्यामुळे उके यांनी जीवाला धोका असल्याचे सांगत या प्रकरणात आपण हजर राहणार नसल्याचे सांगितले आहे, असा दावाही पटोलेंनी केला.