उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये शक्तिपुंज एक्स्प्रेसचे ७ डबे घसरले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वारंवार होणाऱ्या रेल्वे अपघाताच्या घटना ताज्या असतानाच आता आणखी एक रेल्वे अपघात घडला आहे. उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये गुरूवारी सकाळी सहा वाजता हा रेल्वे अपघात झाला. यामध्ये शक्तिपुंज एक्स्प्रेसचे सात डबे रूळावरून घसरले आहे. शक्तिपुंज एक्स्प्रेस हावडाहून जबलपूरला जात असताना ही घटना घडली.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र एका महिन्यात एक्स्प्रेसचे डबे रूळावरून घसरून अपघात होण्याची ही चौथी घटना आहे. रेल्वे रूळ तुटल्याने ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, शक्तिपुंज एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या सुविधा करून त्यांच्या स्थळी पाठविण्याची व्यवस्था केली जाते आहे.

उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथे याआधी १९ ऑगस्टला रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रूळावरून घसरले होते. यामध्ये २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. तसेच उत्तर प्रदेशमध्ये २३ ऑगस्टला कैफियत एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरुन अपघात झाला होता. यामध्ये ७४ प्रवासी जखमी झाले होते.

रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवरच अपघाताची जबाबदारी स्वीकारत सुरेश प्रभू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.