आमदार वैभव नाईक यांच्या दणक्यानंतर मालवण बंदर विभागाला जाग, जेटीवरील ती पिंपे हटवली


सामना प्रतिनिधी, मालवण

शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या दणक्यानंतर मालवण बंदर विभाग खडबडून जागा झाला आहे. गेली अनेक वर्षे मालवण बंदर जेटी परिसरात गंजलेल्या स्थितीत असलेली समुद्रातील दिशादर्शक लोखंडी पिंपे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली आहेत. दरम्यान जेटी परिसर मोकळा झाल्याने तसेच त्या ठिकाणची अस्वच्छता दूर झाल्याने स्थानिकांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.

समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना दिशादर्शक व खडकाळ भाग दर्शवणारी लोखंडी पिंपे समुद्रात बसवण्याची कार्यवाही बंदर विभागाच्यावतीने गेल्या आठ महिन्यात झालेली नाही. मात्र गंजलेल्या अवस्थेतील दिशादर्शक लोखंडी पिंपे बंदर कार्यालयासमोरील जागेत गेली काही वर्षे पडून आहेत. त्यामुळे या बोया तत्काळ हटविण्यात याव्यात अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी गुरवारी (१० जानेवारी) बंदर विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या होत्या. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, आरोग्य सभापती पंकज सादये, स्वप्नील आचरेकर, मंगेश सावंत, किरण वाळके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आमदारांच्या सूचनेला २४ तासही उलटले नाही तोवर बंदर विभागाने शुक्रवारी जेसीबीच्या मदतीने लोखंडी पिंपे हटवून जागा मोकळी केली. या शासकीय जागेत पर्यटकांची वाहने पार्किंग करणे सुलभ होणार आहे. आमदार वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार लोखंडी पिंपे हटवण्यात आली असल्याची माहिती बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी दिली आहे.

आठ महिने समुद्रात दिशादर्शक पिंपेच नाहीत

समुद्रात टाकण्यात येणारी दिशादर्शक लोखंडी पिंप बसवण्याची निविदा प्रक्रिया होऊन आठ महिन्याच्या कालावधी उलटला मात्र अद्यापही समुद्रात पिंपे टाकलेली नाहीत. बंदर विभागाकडून याची कार्यवाही न झाल्याने रात्रीच्यावेळी मासेमारी नौका खडकांना आपटून अपघात घडत आहेत ही बाब मच्छिमारांनी आमदार नाईक यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर ज्या ठेकेदाराने ठेका घेतला त्याच्याकडून कार्यवाही झाली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.