जेव्हा गाडीत कोब्रा घुसतो…

सामना ऑनलाईन। चीन

विचार करा की तुम्ही कारमधून बाहेर जायला निघाला आहात, आणि भररस्त्यात तुमची गाडी बंद पडली. गाडीत काय बिघाड झाला आहे ते बघण्यासाठी तुम्ही बोनेट उघडता आणि त्याचवेळीस जर तुम्हाला आतमध्ये विषारी नाग वेटोळे घालून बसलेला दिसला तर काय होईल. हा विचार जरी केला तरी अनेकांना घाम फुटून हातपाय लटपटायला लागतील. हा सगळा प्रकार प्रत्यक्षात चीनमधल्या एका शहरामध्ये घडला आहे. कारच्या ड्रायव्हरने जेव्हा बोनेटमध्ये किंग कोबरा बसलेला बघितला तेव्हा त्याची बोबडीच वळली होती.

कसाबसा त्याने पोलिसांना फोन लावला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सापाला बोनेटमधून खेचून बाहेर काढायला सुरूवात केली. या सापाची लांबी जवळपास १० फूट इतकी होती. त्याला पकडून पिशवीत बंद करून पुन्हा जंगलात सोडून देताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. या घटनेचा व्हिडिओ हा फेसबुकवर शेअर करण्यात आला असून तो काही मिनिटांतच ७०,००० हजार लोकांनी बघितला आहे. हा व्हिडिओ ५५८ जणांनी शेअर केला असून १८०० पेक्षा अधिक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.