धक्कादायक… हवेतच तुटली कॉकपीटची खिडकी

सामना ऑनलाईन। बीजिंग

चीनमधील शिचुआन एअरलाईन्सच्या ३ यू ८६४४ या विमानाला मोठा अपघात होताना टळला आहे. पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळेच विमानातील १२८ प्रवाशांचे प्राण वाचले असून सह-वैमानिकालाही जीवनदान मिळाले.वैमानिकाने दाखवलेल्या या सतर्कतेमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

चीनमधील शिचुआन एअरलाईन्सच्या ३ यू ८६४४ या विमान सोमवारी चोंगक्यूंगहून ल्हासा येथे जाण्यासाठी रवाना झाले. पण विमान हवेत ३२,००० हजार फूट उंचावर असतानाच अचानक कॉकपीटच्या खिडकीची काच फुटली. वेगाने आत येणाऱ्या वाऱ्यामुळे सह-वैमानिक कॉकपीटमधून फेकला जात होता. सुदैवाने सीटबेल्ट बांधलेला असल्याने आणि कॉकपीटच्या खिडकीच्या कठडा त्याच्या हाती लागल्याने त्याने तो घट्ट धरून ठेवला. तरीही त्याच्या शरीराचा काही भाग हा खिडकीबाहेरच होता. सीटबेल्ट बांधलेला नसता तर वैमानिक हवेच्या वेगाने खिडकीबाहेर उडाला असता आणि मोठा अनर्थ झाला असता. यानंतर वैमानिकाने प्रचंड कष्टाने त्याच्या सीटवर पुन्हा बस्तान बसवलं आणि जवळ असलेल्या चेंगदू भागात विमान उतरवले प्रतिकूल परिस्थिती पायलटने दाखवलेल्या तत्परतेमुळेच सगळ्यांचे प्राण वाचले.

दरम्यान, विमान ३२,००० हजार फूट उंचावर जात असतानाच त्याच्यात बिघाड झाल्याचे लक्षात आले होते. ते हवेत हेलकावे खात होते. रेडिओही व्यवस्थित काम करत नव्हता. पण या मार्गावरुन मी १०० वेळा गेल्याने तेथील वातावरण व भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन विमान सुखरूपपणे लॅण्ड करणे शक्य झाल्याचे पायलटने म्हटले आहे.